Last Updated:
आरोपी दयानंद कसबे याचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी दयानंदच्या मुलाने त्याला संबंधित महिलेसोबत पाहिले आणि ही बाब घरी येऊन आपल्या आईला सांगितली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दयानंद कसबे याचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी दयानंदच्या मुलाने त्याला संबंधित महिलेसोबत पाहिले आणि ही बाब घरी येऊन आपल्या आईला सांगितली. अनैतिक संबंधांचा जाब विचारणाऱ्या पत्नीवर राग काढून नवऱ्याने स्वतःचेच घर थेट पेटवून दिले. या भीषण आगीत घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला असून, दुर्दैवाने घरात पाळलेल्या तीन मांजरींचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेत मांजरीच्या दोन पिल्लांना सुखरूप बाहेर काढले आहे.
याप्रकरणी ३६ वर्षीय पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पती दयानंद आनंता कसबे (वय ३८) याच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाने तिच्यासोबत पाहिले अन् बिंग फुटले!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ९ जुलै रोजी सिंहगड रोड परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहत येथे घडला. आरोपी दयानंद कसबे याचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी दयानंदच्या मुलाने त्याला संबंधित महिलेसोबत पाहिले आणि ही बाब घरी येऊन आपल्या आईला म्हणजेच फिर्यादी महिलांना सांगितली.
अफेअरबद्दल जाब विचारल्याने वाद विकोपाला
मुलाने हकीकत सांगताच पत्नीने थेट संबंधित महिलेचे घर गाठले आणि तिला या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यानंतर घरी परतल्यावर तिने पती दयानंदलाही या संपूर्ण प्रकरणावर जाब विचारला. आपल्या गुपिताचा पर्दाफाश झाल्याचे पाहून दयानंद प्रचंड चिडला. यावरून पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले.
रागाच्या भरात घर पेटवले, निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी
भांडणादरम्यान दयानंदचा राग अनावर झाला. त्याने घरात तोडफोड करत थेट घरालाच आग लावून दिली. काही वेळातच घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
आरोपी पतीवर गुन्हा दाखल
मात्र, ज्यावेळी आरोपीने घर पेटवले, त्यावेळी घरात पाळलेल्या तीन मांजरी आतच अडकून पडल्या होत्या. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्या तीनही मांजरींचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत मांजरीच्या २ छोट्या पिल्लांची आगीतून सुखरूप सुटका केली. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पर्वती पोलिसांनी आरोपी पती दयानंद कसबे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pune,Maharashtra
Pune: बापाला ‘तिच्यासोबत’ पाहिलं अन् मुलाने आईला येऊन सांगितलं, जाब विचारताच त्याची सटकली, घरच पेटवून दिलं!
