Pravin Tarde on Deool Band 2: यंदाचे वर्ष मराठी चित्रपटांसाठी प्रचंड यशस्वी ठरताना दिसत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत. रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपटानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाला देशातच नव्हे तर परदेशातही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाने जगभरात 100 कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केलंय. अजूनही हा चित्रपट बघायला लोक आवर्जून जात आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत 100 कोटी कमवण्याचं सीक्रेट त्यांनी सांगून टाकलंय.
‘देऊळ बंद 2’ने 100 कोटी कसे कमावले ?
श्रद्धा, शेतकऱ्यांवर आलेलं संकट आणि स्वामी समर्थांचं तत्वज्ञान यांची सांगड असणाऱ्या ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाला महाराष्ट्रभर उत्तम प्रतिसाद मिळाला. अगदी ग्रामीण भागापासून ते परदेशातही या चित्रपटाने दमदार कमाई केली. ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षाही अधिक कलेक्शन करत मराठी मनोरंजन सृष्टीत एक नवा विक्रम केलाय. दरम्यान, एका मुलाखतीत 100 कोटी कमावण्याचं गुपित दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलं. ते म्हणाले ‘सिनेमाला 100 कोटी कमावण्याचा सगळ्यात मोठं गुपित काय आहे माहितीय का? ते म्हणजे नवीन आयडिया. आम्ही निर्मात्यांसोबत बसून नवीन आयडिया केल्या.फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवर अवलंबून राहायचं नाही ही आयडिया आम्ही केली.हे शंभर कोटींच्या मागचा सगळ्यात मोठं कारण आहे.थिएटर मधून पैसा येतो पण आम्ही त्यासोबत तंबू थिएटर चालवले.’ ‘विषयच भारी’ या यूट्यूब चॅनला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘..नाहीतर ‘देऊळ बंद 2′ तिथेच थांबला असता’
ते पुढे म्हणाले ‘ ‘देऊळ बंद 2 ‘ सिनेमा क्षमतेनुसार बॉक्स ऑफिसवर 88 ते 90 कोटींवरच थांबला असता. ज्या भागात थिएटर नाही, तिथे स्वामींच्या सेवा केंद्रात जाऊन आम्ही 25 – 30 – 40 कृपया था सिनेमा दाखवला.मग तंबू थिएटरमध्ये शो केले. तंबू शो मधून 4:15 कोटींचं कलेक्शन आम्ही केलं.परदेशात शो हाऊसफुल झाला तर एका शोचं कलेक्शन साडेचार ते पाच लाखांपर्यंत जातं.त्यामुळे अमेरिकेत आम्ही 54 ते 55 शो केले . जर्मनी कॅनडा, जपान, सिंगापूर, नेदरलँड, दुबईमध्ये शो केले. परदेशात पावणेआठ कोटींचं कलेक्शन झालं. सांगायचं तात्पर्य म्हणजे फक्त बॉक्स ऑफिसवर अवलंबून न राहता आम्ही वेगळ्या वाटा निवडल्या. दोन वर्ष सिनेमासाठी दिली आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 50 दिवस मी घरात थांबलो नाही.मी रोज प्रत्येक थिएटरमध्ये गेलो . कसलाच कॉश्च्यूम डिझायनर, मेकअप हेअर स्टायलिस्ट नाही.माझा मोबाईल आणि मी.असं एकही थिएटर नाही, जिथे मी गेलो नाही.उन्हातानात पावसात फिरलो.मुंबईत रात्रीचे शोही हाउसफुल व्हायचे.प्रत्येक प्रेक्षकाला मी फोटो दिलाय.मी स्वतःहून हे सगळं केलं.हे शंभर कोटी अचानक आलेले नाहीत.असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं.