Last Updated:
Pimpri Chinchwad Building Collapse Accident: मोशी कचरा डेपो येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या जवळ तीन मजली प्रशासकीय इमारत आहे. याच इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक अडकले होते. त्यातील सुरुवातीस ५ नागरिक सुखरुप बाहेर आले. इमारतीत अडकलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य राबविले. शर्तीच्या प्रयत्नानंतर इमारतीत अडकलेल्या ६ नागरिकांना सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित अंदाजे १२ नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बचावकार्यादरम्यान बाहेर काढलेल्या नागरिकांना पुढील उपचारार्थ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसेच नजिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोशीमधील दुमजली इमारत खचली, घटना कशी घडली?
मोशी कचरा डेपो येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या जवळ तीन मजली प्रशासकीय इमारत आहे. याच इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. मागील दोन-तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा भलामोठा डोंगर भूस्खलनासारखा इमारतीवर कोसळला. त्यामुळे इमारत कोसळून जवळपास १४ लोक ढिगाऱ्याखाली अडकले.
बचावकार्य वेगात सुरू
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, आपत्कालीन व्यवस्थापन आणि लष्कराची तुकडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सहा लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत दोन मजली आहे. इमारत कोसळली तेव्हा आतमध्ये अनेक लोक उपस्थित होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या अंदाजानुसार, कमीत कमी 10 नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ढिगारा उपसण्याचे काम वेगाने सुरू असून, अडकलेल्या लोकांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या आहेत.
कुणाकुणाला बाहेर काढण्यात यश?
सोमनाथ शेळके वय ४० वर्षे
सचिन रामदास दबडगाव वय ३२ वर्षे
रामप्रताप चव्हाण वय वर्षे ३६
सुजाता शिंदे वय वर्षे ४०
दादासाहेब आरडे वय वर्षे ४६
रणवीर पायाला जखम ४० वर्षे
पाहणी केल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले…
आज अतिशय दुर्दैवी घटना घडली. गेल्या दोन तीन दिवसांत सहाशे मिमी पाऊस पडला. त्यामुळे कचरा डेपोतील कचरा वाहून आला. एवढा कचरा पडल्यामुळे एवढी मोठी इमारत पत्त्यासारखी कोसळली. सुरुवातीला २३ जण होते. अगदी काही मिनिटांत पाच जण सुखरूपणे बाहेर निघाले. बचाव पथकाने सहा जणांना बाहेर काढले. तीन लोकांशी संपर्क झाला आहे. मलबा पायावर असल्यामुळे आम्हाला हलता येत नसल्याचे ते सांगतायेत, त्यांना आम्ही बाहेर काढू, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
