Pawanraje Nimbalkar Case: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशलकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा (Pawanraje Nimbalkar Case) अखेर आज (20 जून 2026) अंतिम निकाल लागला आहे. खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर अमित शाह यांनी CBI ला निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून पुढे नेमकं काय होतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Pawanraje Nimbalkar Case: मुक्त झालेल्या आरोपींची यादी
१. डॉ. पद्मसिंह पाटील (८६ वर्षे)
२. सतीश मंदाडे
३. मोहन शुक्ला
४. शशिकांत कुलकर्णी
५. कैलास यादव
६. दिनेश तिवारी
७. पिंटू सिंग (मुख्य शूटर)
८. छोटे पांडे
Pawanraje Nimbalkar Case: निंबाळकर कुटुंबासाठी मोठा कायदेशीर धक्का; पोलिसांची एक घोडचूक
तपासातील सर्वात गंभीर त्रुटीवर भाष्य करताना न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले की, “या प्रकरणात कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला नाही. कॉल डिटेल रेकॉर्ड गोळा करण्यात आले नाहीत. आरोपी परस्पर संपर्कात होते का, याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणांकडे नाही.” न्यायालयाने पुढे नमूद केले की, जर मोबाईल डेटा आणि सीडीआर सादर करण्यात आले असते, तर आरोपींमधील कथित कट किंवा संपर्क सिद्ध करण्यास मदत झाली असती. मात्र पोलिसांच्या या घोडचुकीमुळे तपासातील एक महत्त्वाचा दुवा कायमचा हरवला.
खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी आजचा हा निकाल मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. कारण, निकालापूर्वीच माध्यमांशी प्रतिक्रिया देताना ओमराजेंनी, आम्हाला न्याय मिळेल, आम्ही 20 वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत असून न्यायालयीन प्रक्रियेत मोठा संघर्ष केलाय, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, आजचा निकाल खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात गेल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर, पद्मसिंह पाटील यांच्या सूनबाई अर्चना पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सत्याचा विजय झाला, माझी मुलं लहान-लहान होती, म्हणजे सासूबाईंसह आम्हाला त्रास सहन करावा लागला. उगीच बेंबीच्या देटापासून ओरडलं म्हणजे एखादी गोष्ट खरी होत नसते, असेही पाटील यांनी म्हटले.
Pawanraje Nimbalkar Case: नेमकं प्रकरण काय होतं?
३ जून २००६ रोजी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत एक्सप्रेस हायवेवर पवनराजे निंबाळकर यांची कार अडवून अंदाधुंद गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांचा चालक समद काझी याचाही मृत्यू झाला होता. सीबीआयने या प्रकरणात २५ लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ठेवला होता. मात्र, तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आज सीबीआय कोर्टाने सर्व ८ आरोपींची निर्दोष सुटका केल्याने या प्रकरणाला अत्यंत अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे.
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे