बेळगाव : आषाढी वारीची (Ashadhi)लगबग सुरू झाली असून माऊली नामाच्या गजरात वारकरी तल्लीन झाले आहेत. पंढरीच्या वारीसाठी बेळगाव जिल्ह्याच्या अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या घराण्यातून माऊलींच्या अश्वांचे आज प्रस्थान झाले. टाळ, मृदुंगाचा गजर, मनी पंढरीच्या पांडुरंगाची ओढ आणि माऊली माऊलीचं जप करत मोठ्या उत्साहात शितोळे घराण्यासह स्थानिकांनी अश्व मोती आणि जरी पटक्याचा अश्व हिरा या मानाच्या अश्वांचे पूजन करत आळंदीच्या (Alandi) दिशेने प्रस्थाने केले. पंढरीच्या वारीसाठी आज अंकली ते आळंदी अशा 300 किमी प्रवासास प्रारंभ झाला. त्यानंतर, आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी पंढरीकडे (Pandharpur) प्रस्थान होणार आहे.
आषाढी वारीला अवघा महिना उरला असताना शेगावहून मानाच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. इतरी पालख्या, दिंड्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यातच, आता माऊलींच्या पालखीसाठीचे अश्वही आळंदीकडे प्रस्थान झाले आहेत. बेळगावच्या अंकली येथील शितोळे घराण्याकडे 194 वर्षापासून माऊलीच्या अश्वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे दोन्ही अश्वानी अंकली येथून आळंदीकडे प्रस्थान केले. हैबतबाबा आरफळकर यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्त्व मिळवून दिले. तेव्हापासून माऊलीच्या अश्वांचा व माऊलीच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. अनेक पिढ्यापासून चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार हे निष्ठेने चालवत आहेत.
अश्वांचे पूजन, गावात मिरवणूक
अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली, जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार, विहानराजे शितोळे सरकार यांच्या उपस्थितीत चिकोडी सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी केली व दर्शन घेतले. गावातील पारंपारीक मार्गावरून ही मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना निरोप देण्यात आला.
दरम्यान, याप्रसंगी कापशीकर राणोजीराजे घोरपडे, राजाभाऊ थोरात पुणे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख विक्रम महाराज मोरे, संत सेवक विलास तात्या बालवडकर,पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे सचिव सौरभ शिंदे, संत ज्ञानेश्वर पादुका मंदिराचे विश्वस्त संदीप काळे, योगेश गोंधळे उपस्थित होते. अश्व चालक म्हणून तुकाराम कोळी, अक्षय परीट सेवा बजावणार आहेत.
300 किमींचा प्रवास, 8 ठिकाणी मुक्काम
मानाच्या अश्वांचे आज 27 जून रोजी अंकली येथून प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम मिरज, 28 जूनला सांगलवाडी राम मंदिर, 29 जूनला ईश्वरपूर पेठनाका, 30 जूनला वाठारगाव, 1 जुलै रोजी भरतगाव, 2 जुलै रोजी भुईंज, 3 जुलै रोजी सारोळा, 4 जुलै रोजी शिंदेवाडी, 5 व 6 जुलै रोजी पुणे असा 300 किमींचा प्रवास असणार आहे.
हेही वाचा
पालखी निघाली… शेगावच्या गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान! काही खास क्षणचित्रे..
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ