मुंबई : लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि 22 वर्षांच्या मयंक लोहारला (Mayank Lohar) त्याचे प्राण गमवावे लागले. रोशन सुवर्णा असं आरोपीचं नाव असून त्याने बॅगेतून चाकू काढला आणि मयंकवर सपासप वार करून त्याला संपवलं. या घटनेमुळे लोकलमधील प्रवासही कितपत सुरक्षित आहे यावर चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी रोशन सुवर्णला पकडलं, त्यावेळी मयंक जिवंत आहे का? असा प्रश्न आरोपीने पोलिसांना केला. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनीही त्याला चुकीची माहिती दिल्याचं समोर आलं आहे.
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या लोकलमध्ये केवळ पावसादरम्यान डब्याचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून ही थरारक हत्या करण्यात आली. मयांक लोहार (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी (GRP) अवघ्या १५ तासांच्या आत अत्यंत कौशल्याने तपास करत ३० वर्षीय मुख्य आरोपी रोशन सुवर्णा (Roshan Suvarna) याला पनवेलमधून बेड्या ठोकल्या आहेत.
Mumbai Local Train Crime : बॅगेवरच्या लोगावरून आरोपीला अटक
ही हृदयद्रावक घटना चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात घडली. आरोपीने गुन्ह्यानंतर पळ काढला होता, मात्र पोलिसांनी सुमारे 400 सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज आणि आरोपीच्या पाठीवरील बॅगेवर असलेल्या एका विशिष्ट ‘कंपनीच्या लोगो’चा (Company Logo) आधार घेत त्याचा माग काढला आणि त्याला अटक केली. या धक्कादायक हत्या प्रकरणामुळे मुंबई लोकल रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Mumbai Local Train Mayank Lohar : आरोपी पळून जायच्या तयारीत
दरम्यान, आरोपी रोशन सुवर्णा हा त्याच्या मूळगावी, कर्नाटकातील मंगळुरूला पळून जायच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने बसच्या तिकिटाचे बुकिंगही केलं होतं. पनवेलमधून तो जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाळे लावले. रोशन सुवर्णा त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.
अटक झाल्यानंतर आरोपीने पोलिसांना पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे, मयंक जिवंत आहे का? त्यावर पोलिसांनी त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं. दरम्यान, आरोपीने इंटरनेटवर सर्च केल्यानंतर मयंकचा मृत्यू झाल्याचं त्याला समजलं. त्यावरही पोलिसांनी त्याला ही बातमी चुकीची असल्याचं सांगितलं. आरोपी गोंधळून जाऊन चुकीचं काही करू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचं दिसून आलं.
Who Is Roshan Suvarna : कोण आहे रोशन सुवर्णा?
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन सुवर्णा (वय 30) हा मीरा रोड येथील रहिवासी आहे. तो एका संस्थेमध्ये बारकोड बनवण्याचे (Barcode Making) काम करतो. रोशन मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून त्याचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. मंगळवारी रात्री साधारण 10.42 वाजताच्या सुमारास मृत मयांक लोहार आणि आरोपी रोशन सुवर्णा या दोघांनी अंधेरी स्टेशनवरून चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेन पकडली होती. मुसळधार पाऊस सुरू असल्याने डब्याचा एक दरवाजा प्रवाशांनी बंद ठेवला होता.
Mumbai Train Killing Story : नेमका वाद काय आणि कसा घडला?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोशन सुवर्णा याने अचानक बंद असलेला तो दरवाजा उघडला. पाऊस जोरात असल्याने रेल्वेचे पाणी थेट डब्यात आले आणि आत बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडाले. यामुळे विरारचा रहिवासी असलेल्या मयांक लोहार याने पुढे होऊन तो दरवाजा पुन्हा बंद केला. याच कारणावरून रोशन आणि मयांक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली.
वाद इतका वाढला की त्यांच्यात किरकोळ हाणामारी झाली. यावेली डब्यातील इतर सह-प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले. काही प्रवाशांनी मयांकची बाजू घेत रोशनला सुनावले आणि त्याला डब्याच्या दुसऱ्या टोकाला पाठवले. सह-प्रवाशांनी सर्वांसमोर अपमान (Humiliated) केल्याचा राग रोशनच्या मनात बसला आणि त्याने या सर्व प्रकारासाठी मयांकला जबाबदार धरले.
Stabbing In Moving Train : धावत्या ट्रेनमध्ये थरार; चाकूने केले वार
लोकल ट्रेन गोरेगाव आणि मालाड स्टेशनच्या दरम्यान असताना, संतापलेल्या रोशनने आपल्या पाठीवरील बॅगेतून एक मोठा धारदार चाकू बाहेर काढला. त्याने थेट मयांकवर हल्ला करत त्याच्या छातीवर आणि पोटावर तीन ते चार वेळा सपासप वार केले. मयांक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि बेशुद्ध झाला.
हे भयानक दृश्य पाहून डब्यातील इतर प्रवासी प्रचंड घाबरले. एका प्रवाशाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये रोशन हत्येनंतर हातात चाकू घेऊन इतरांना धमकावताना दिसत होता. ट्रेन बोरिवली स्टेशनजवळ पोहोचताच, ती थांबण्यापूर्वीच रोशनने चालत्या गाडीतून उडी मारली आणि पळ काढला. मयांकला तात्काळ कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
CCTV And Company Logo Investigation : 400 सीसीटीव्ही आणि ‘त्या’ एका लोगोमुळे लागला शोध
बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी सात वेगवेगळी पथके तयार केली होती. आरोपी बोरिवली स्टेशनवरून बाहेर पडताना आणि तिथून रिक्षा पकडून घरी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आरोपीच्या पाठीवर असलेल्या बॅगेवर एका विशिष्ट ‘कंपनीचा लोगो’ होता. पोलिसांनी त्या लोगोच्या आधारे तो कोणत्या कंपनीचा कर्मचारी आहे, याचा शोध घेतला आणि थेट मीरा रोड येथील त्याच्या घराचा पत्ता मिळवला.
तो घरी पोहोचला होता, मात्र त्याने कुटुंबाला या घटनेबाबत काहीही सांगितले नव्हते. पोलीस घरी पोहोचण्यापूर्वीच तो कर्नाटकातील आपल्या मूळ गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता आणि पनवेलपर्यंत पोहोचलाही होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे लोकेशन ट्रॅक करून त्याला पनवेलमध्येच रंगेहात अटक केली. रोशनने तो चाकू एका ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मित्रासाठी खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही बातमी वाचा:
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?