पावसाळ्यात पोटाशी संबंधित विविध आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्यात उलट्या, जुलाब, फूड पॉयझनिंग, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, टायफॉइड आणि हिपॅटायटीस ‘ए’ यांसारख्या संसर्गाचं प्रमाण वाढतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात खबरदारी बाळगली तर, अशा प्रकारच्या संसर्गापासून बऱ्याच अंशी बचाव करता येणं शक्य आहे. त्यामुळे, पावसाळ्यात पोटाच्या विकारांपासून किंवा संसर्गापासून स्वतःचा बचाव करायचा असेल, तर कोणत्या सवयींमध्ये त्वरित बदल करणं आवश्यक आहे, जाणून घेऊया.
सर्वात आधी, पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्या. पावसाळ्यात पोटाचे बहुतेक संसर्ग दूषित पाण्यामुळेच होतात. मुसळधार पावसामुळे जिवाणू सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणांपर्यंत आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपर्यंत पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत, स्वच्छ दिसणारं पाणी पूर्णपणे सुरक्षित असेलच असं नाही. यासाठीच, डॉक्टर केवळ उकळलेलं, गाळलेलं किंवा पॅकबंद पाणी पिण्याचा सल्ला देतात.
पाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका असेल तर, विश्वासार्ह वॉटर प्युरिफायर किंवा क्लोरिनेशनच्या गोळ्यांचा वापर केला जाऊ शकतो. तसंच, बाहेरून मिळणारं पाणी किंवा पेयं न घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात; त्याऐवजी स्वतःचं पिण्याचं पाणी सोबत नेणं अधिक हितावह ठरतं.
डॉक्टरांच्या मते, पावसाळ्यात बराच वेळ उघडं राहिलेलं अन्न खाणं टाळावं. हवेतील ओलाव्यामुळे जिवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांची वेगानं वाढ होते, ज्यामुळे अन्न दूषित होऊ शकतं. तज्ज्ञांच्या मते, घरी ताजं बनवलेलं अन्न हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. रस्त्यावरील उघडं अन्न, आधीच कापून ठेवलेली फळं आणि बराच वेळ उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ खाणं टाळावं, कारण त्यातून संसर्गाचा धोका अधिक असतो.
फळं आणि भाज्या केवळ पाण्यानं धुवून वापरल्या जातात, पण पावसाळ्यात ही खबरदारी पुरेशी नसते. त्यावर माती, कीटकनाशकं आणि विविध सूक्ष्मजीव असू शकतात. त्यामुळे डॉक्टर फळं आणि भाज्या नीट स्वच्छ करण्याचा सल्ला देतात. गरजेनुसार, काही मिनिटं व्हिनेगर मिसळलेल्या पाण्यात भिजवून ठेवता येतात. याव्यतिरिक्त, मोड आलेली कच्ची कडधान्यं आणि आधीच कापून ठेवलेली फळं खाणं टाळावं, कारण त्यांमधे जिवाणूंची वाढ होण्याचा धोका अधिक असतो.
डॉक्टरांच्या मते, संसर्ग टाळण्यासाठी हात धुणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. स्वयंपाक करण्यापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर आणि बाहेरून परत आल्यावर हात साबणानं स्वच्छ धुतले पाहिजेत.