Akshay Khanna Mahakali Promo: ‘धुरंधर’ स्टार अभिनेता अक्षय खन्नाच्या ‘महाकाली’ या पौराणिक चित्रपटाची (Mahakali) गेल्या अनेक दिवसांपासून एकच चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचा नवा प्रोमो निर्माते प्रशांत वर्मा यांनी रिलीज केला असून, त्यामध्ये अक्षय खन्ना (Akshay Khanna) असुरगुरू शुक्राचार्य यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या अंदाजात दिसत आहेत. भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला अक्षय खन्नाच्या भयानक अंदाजाने चाहत्यांच्या मनात या सिनेमाविषयी, त्याच्या भूमिकेविषयी कुतूहल निर्माण झालंय. प्रोमो रिलीज होताच सोशल मीडियावर ‘महाकाली’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महाकालीचा दमदार प्रोमो रिलीज
‘हनु-मॅन’सारख्या शानदार चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारे साऊथ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रशांत वर्मा गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाकाली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आता या पौराणिक चित्रपटाची तयारी पूर्ण झाली असून, नुकताच रिलीज झालेला प्रोमो त्याचीच झलक दाखवलीय. 24 ऑगस्ट रोजी प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर ‘महाकाली’चा प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये अक्षय खन्ना मध्यवर्ती भूमिकेत दिसत असून, तो चित्रपटात दैत्यगुरू शुक्राचार्य यांची नकारात्मक भूमिका साकारत आहे.
याशिवाय, प्रोमोमध्ये साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता समुथिरकानी यांचीही झलक पाहायला मिळते. तर प्रोमोच्या शेवटी अभिनेत्री सीरेया रेड्डी माता महाकालीच्या रूपात दिसते. त्यांच्या या अवतारामुळे प्रोमो आणखी प्रभावी आणि दमदार बनला आहे. एकूण 2 मिनिटे 54 सेकंदांचा ‘महाकाली’चा हा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः अक्षय खन्ना यांचा असुरगुरू शुक्राचार्य यांचा लूक आणि त्यांची व्यक्तिरेखा चर्चेचा विषय ठरत आहे. हा एक तेलुगू चित्रपट असून तो हिंदी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.
कधी रिलीज होणार ‘महाकाली’?
‘महाकाली’च्या प्रोमोसोबतच निर्माता प्रशांत वर्मा यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. हा पौराणिक चित्रपट पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर, म्हणजेच 8 जानेवारी 2027 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.