मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही


मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai) शहरात तुफान पावसामुळे (Rain) ठिकठिकाणी पाणी साचलं असून झाडपडी आणि अपघाताच्या दुर्घटना घडत आहेत. साकीनाका इथल्या खैरानी रोड परिसरात आज मॅनहोल दुरुस्तीचे काम सुरु होतं. यावेळी, दुरुस्तीच्या कामासाठी मॅनहोलचे झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं. मात्र, अन्सारी शेख नावाचे गृहस्थ त्याच रस्त्याने चालत येत होते, ते फोनवर बोलत जात असताना त्यांनी खाली पाहिलंच नाही आणि थेट उघड्या मॅनहोलमध्ये (Manhole) पडले. या दुर्दैवी घटनेत अन्सारी यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून महापालिका प्रशानाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत,  हे मॅनहोल 20 ते 25 खोल आहे.

चालता चालता, अवघ्या काही क्षणात ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याचे बाजूला काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला समजले. त्यानंतर एकच धावाधाव सुरु झाली. उपस्थितांनी तात्काळ महानगरपालिका आणि रेस्क्यू टीमला कळवले. सदर घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. या व्यक्तीला सदर रस्त्यावरील पुढील 25 फुटावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. जेव्हा बाहेर काढले, तेव्हा सदर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत होती. मात्र, दुर्दैवाने थोड्याच वेळात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर महापालिकेतील विरोधी पक्षाने तीव्र संताप व्यक्त करत सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केलं. 

शिवसेना उबाठा पक्षाच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी देखील एबीपी माझाशी बोलताना 2017 च्या घटनेचा उल्लेख केला. डॉ.अमरापूरकर यांचाही असाच यापूर्वी मृत्यू झाला होता. प्रशासन मॅनहोलबाबत गंभीर का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, 2017 च्या शॉकींग घटनेनंतरही सुरक्षाव्यवस्थेत अपेक्षित सुधारणा का झाली नाही? उघड्या मॅनहोल आणि नाल्यांभोवती प्रभावी सुरक्षा उपाय का करण्यात आले नाहीत? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सुरक्षा उपाययोजना, मॅनहोल झाकणे आणि धोकादायक ठिकाणी संरक्षक बॅरिकेड्स लावल्याचे दावे करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कामकाजावर या घटनेमुळे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वार्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही – महापौर

दरम्यान, आजच्या घटनेबाबत बोलताना महापौर रितू तावडे यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं. खुद्द येथील वॉर्ड ऑफिसरलाही या कामाबाबत माहिती नव्हती, हे धक्कादायक आहे. या कामासाठी कुठलीही वर्क ऑर्डर देण्यात आली नव्हती, समजा कुणी खासगी ठेकेदाराने काम सुरू केलेलं असेल तरी तिथं बॅरिकेड्स लावायला पाहिजे होते. आम्ही अॅक्शन मोडवर असून कालच आम्ही चेंबूर घटनेप्रकरणी तीन जणांचे निलंबन केले आहे, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. तसेच, या कामाची देखील मी माहिती घेणार असून चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल, जे झालं ते चुकीचं आहे, असेही महापौरांनी म्हटलं.  

2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू

मुंबईत 29 ऑगस्ट 2017 रोजी झालेल्या मुसळधार पावसात देशाला हादरवणारी दुर्घटना घडली होती. मुंबईतील प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर प्रभादेवी-एल्फिन्स्टन रोड परिसरात साचलेल्या पाण्यातून जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये वाहून गेले होते. दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर त्यांचा मृतदेह वरळी परिसरात सापडला होता. या घटनेनंतर मुंबईतील उघडे मॅनहोल, पावसाळी सुरक्षाव्यवस्था आणि महापालिकेच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, नऊ वर्षांनंतरही मुंबईकरांना अशाच प्रकारच्या धोक्याला सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. मुंबईतील साकीनामा परिसरात आज पुन्हा उघड्या नाल्यात (मॅनहोल) मध्ये पडून एका निष्पाप नागरिकास आपला जीव गमवावा लागल्याने 2017 च्या दुर्घटनेची पुनरार्वृत्ती झाल्याची भावना काहींनी व्यक्त केली. 

हेही वाचा

धक्कादायक! मुंबईत ‘मॅनहोल’मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *