भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. दोन सामने रंगले असून दोन्ही सामने भारताने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. आता भारतासाठी क्लीन स्वीप पूर्ण करत मालिका संपवण्याची संधी आहे. आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. चेन्नईमध्ये तिसरा सामना खेळवला जाईल. आता या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन खेळणार की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. कारण मागील सामन्यात या दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली होती. आता हे दोन्ही खेळाडू खेळण्यासाठी फिट आहे कती नाही याबद्दलची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यापूर्वी, भारताचे सहाय्यक प्रशिक्षक, रायन टेन डोशेट यांनी शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या दुखापतींबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
भारताने ही मालिका आधीच 2-0अशा अभेद्य आघाडीसह जिंकली आहे. दुसऱ्या सामन्यात कर्णधार शुभमन गिल, ज्याला क्रॅम्प आले होतेतर गिल व्यतिरिक्त, इशान किशनलाही लखनौमध्ये खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतरच्या तपासणीत दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आणि फलंदाजी केल्यानंतर इशान सावरला. त्यामुळे, त्याच्या तंदुरुस्तीबद्दल कोणतीही चिंता नाही.
डोशेट यांनी सांगितले की शुभमन तंदुरुस्त आहे. त्या दिवशीच्या उन्हामुळे त्याच्या पोटरीत फक्त थोडासा गोळा आला होता, पण तो पूर्णपणे ठीक आहे. ईशानचा खांदा ठीक आहे. फलंदाजी केल्यानंतर तो चांगला सावरला आहे. नितीश रेड्डीसुद्धा किरकोळ वेदनेमुळे मागचा सामना खेळू शकला नाही, पण तो तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. त्याची तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारताला त्याला 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याचा संभाव्य पर्याय म्हणून तयार करायचे आहे.
विशेष म्हणजे, रायन टेन डोशेट यांनी असे संकेत दिले आहेत की “डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग चेन्नईतील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यातून बाहेर असू शकतो. वर्कलोडमुळे अर्शदीपला विश्रांती दिली जाऊ शकते.” त्याने दोन सामन्यांमध्ये 14.40 च्या प्रभावी सरासरीने पाच विकेट घेतल्या आहेत.