Hindu Religion: हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांची पूजा केली जाते. प्रत्येक देवी-देवता विशिष्ट शक्ती आणि गुणांचे प्रतीक मानली जाते. भगवान ब्रह्मा हे सृष्टीचे निर्माते, भगवान विष्णू हे पालनकर्ते आणि भगवान शिव हे संहारकर्ते मानले जातात. तर देवींमध्ये देवी दुर्गा, महालक्ष्मी, सरस्वती, पार्वती आणि काली यांची विशेष पूजा केली जाते. तसं पाहायला गेलं तर भारतात विविध ठिकाणी अनेक देवी-देवतांची मंदिरं आहेत. पण तुम्हाला हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की तब्बल 98% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या एका देशात देवी दुर्गाला समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या रहस्यमय अखंड ज्योतीसाठी आणि 300 वर्षांच्या इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. जाणून घ्याच…
बहुसंख्य मुस्लिम असलेल्या देशात देवीचं मंदिर…एक आकर्षणाचा विषय…
तब्बल 98% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या अझरबैजान या देशात एक असे मंदिर आहे, जे त्याच्या रहस्यमय अग्निसाठी आणि अद्भूत इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. माहितीनुसार, हे मंदिर देवी दुर्गा आणि अग्नि पूजेशी संबंधित श्रद्धांमुळे विशेष मानले जाते. मुस्लिम-बहुल देश (सुमारे 98%) असूनही, हे प्राचीन मंदिर लोकांना आश्चर्यचकित करते. या मंदिराला ‘अग्नि मंदिर’ म्हटले जाते. त्याचे मूळ नाव ‘बाकू अतिश्गाह’ (Baku’s Atishgah) आहे. येथे वर्षानुवर्षे तेवत असलेली अखंड ज्योत लोकांमध्ये एक प्रमुख आकर्षण ठरली आहे.

सुमारे 300 वर्ष जुनं मंदिर…
मान्यतेनुसार, हे मंदिर अझरबैजानची राजधानी बाकू जवळील सुराखानी परिसरात आहे. हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. इतिहासकारांच्या मते, प्राचीन काळी भारतातील व्यापारी आणि ऋषीमुनी या मंदिराला भेट देत असत. या लोकांनी या मंदिराच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली. मंदिराच्या भिंतींवर संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमध्ये लिहिलेले शिलालेख आजही पाहायला मिळतात. यावरून येथील भारतीय संस्कृतीचा खोलवरचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. मंदिराची रचना देखील हिंदू मंदिरांसारखी आहे.
सर्वात लक्षवेधी गोष्ट – इथली अखंड ज्योत…
इतिहासकारांच्या मते, या मंदिराचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे येथील अखंड ज्योत. पूर्वी, जमिनीखाली असलेल्या नैसर्गिक वायूमुळे ही ज्योत नैसर्गिकरित्या जळत असे. त्यामुळेच हे मंदिर ‘अग्निचे मंदिर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. असे म्हटले जाते की, 1969 सालापर्यंत ही ज्योत नैसर्गिकरित्या जळत होती. त्यानंतर, वायूचा दाब कमी होऊ लागला. तेव्हापासून, गॅस पाइपलाइनच्या मदतीने ही ज्योत सतत तेवत ठेवली जाते. हे रहस्य या ठिकाणाला आणखी विशेष बनवते.

शिलालेखांमध्ये भगवान गणेश आणि अग्निदेव यांचाही उल्लेख…
अतिशगाह मंदिर आता एक संग्रहालय आणि ऐतिहासिक स्मारक म्हणून जतन केले आहे. येथे आता नियमित पूजा होत नाही, परंतु पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. मंदिर परिसरातील 26 खोल्या विविध धार्मिक परंपरांचे प्रतिबिंब दर्शवतात. शिलालेखांमध्ये भगवान गणेश आणि अग्नि देव यांचाही उल्लेख आहे, म्हणूनच हे स्थळ हिंदू आणि झोरोस्ट्रियन (पारशी) परंपरांच्या संगमाचे प्रतीक मानले जाते.
जगभरातून हजारो लोक मंदिराला भेट देतात..
जगभरातून दरवर्षी हजारो लोक या मंदिराला भेट देतात, ज्यात भारतातील पर्यटक विशेष रस दाखवतात. बाकूमध्ये पोहोचल्यानंतर, अतिशगाह मंदिरापर्यंत रस्त्याने सहज पोहोचता येते. या मंदिराला केवळ धार्मिक महत्त्वच नाही, तर ते त्याच्या इतिहास, संस्कृती आणि रहस्यमय अग्निमुळेही लोकांना आकर्षित करते. यामुळेच अझरबैजानमधील हे अद्वितीय मंदिर जगभरात चर्चेचा विषय बनून राहिले आहे.
हेही वाचा
Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसू नये! तुमच्या राशीनुसार सौभाग्यासाठी कोणते रंग शुभ? धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व जाणून घ्या…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला हत्येचा प्लॅन? पुण्यातील रक्तरंजीत प्रकरणाची INSIDE STORY