Heavy Rain Speedy Wind in Mumbai: मुंबईत आज सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने काल मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र, सोमवारी हवामान खात्याने हा अलर्ट बदलून मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात एक छोटेखानी निवेदन दिले. यावेळी त्यांनी मुंबईसह आजुबाजूच्या परिसरात दुपारी अत्यंत वेगाने वारे वाहतील, अशा इशारा दिला होता. त्यानुसार, आता मुंबई आणि इतर भागात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज वाऱ्याचा वेग 90 किमीच्या आसपास पोहोचू शकतो, असा अंदाज आहे. याचे नेमके कारणही आता समोर आले आहे. (Maharashtra Rain news)
पुणे, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं जे क्षेत्र आहे, ते डिप्रेशनमध्ये रुपांतरित झाल्याने वाऱ्यांची तीव्रता इतकी वाढली आहे. त्याचा फिअर झोन मोठ्याप्रमाणावर कोकणात असल्याने या परिसरात वेगाने वारे वाहताना दिसत आहेत. या वाऱ्यांचा वेग 90 किमीपर्यंत जाऊ शकतो, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत आज दुपारी तीन वाजता समुद्राला भरती येणार आहे. या काळात जोरदार पाऊस सुरु राहिल्यास पाणी साचण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीबाबत काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा करण्यात आली.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आज दुपारनंतर अनेक भागात मोठ्याप्रमाणावर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. कोणीही अत्यावश्यक कारण असल्याशिवाय प्रवास करु नये. तरुणांनी या काळात पर्यटनासाठी धबधबे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आणखी वाचा