Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ..याच गोकुळ दूध संघाने आपल्या उत्पादन विक्रीसाठी काढलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोकुळच्या उत्पादनासाठी खरंच हलाल प्रमाणपत्राची गरज आहे का? असा सवाल आता काही संघटनांनी उपस्थित केला. गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वादानंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच समोर आलेल्या या हलाल प्रमाणपत्र मुद्द्यामुळे गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग देखील चढला आहे.
2018 पासून गोकुळने हलाल प्रमाणपत्र काढल्याचं समोर
कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून या गोकुळकडं बघितलं जातं. रोज जवळपास 17 लाख लिटर दूध संकलन आणि वर्षाकाठी कोट्यावधीची उलाढाल यामुळे गोकुळ हे जिल्ह्यातील एक प्रमुख सत्ता केंद्र आहे. या संघावर आपलं वर्चस्व राहावं यासाठी सगळ्याच प्रमुख नेत्यांची धडपड सुरू असते. एरवी टँकर, कमिशन, भ्रष्टाचार अशा स्वरूपाच्या आरोप प्रत्यारोपामध्ये असलेल्या गोकुळ दूध संघावर इतिहासात पहिल्यांदाच धार्मिक स्वरूपाचा आरोप होत आहे. गोकुळने आपल्या तूप, लोणी, दूध पावडरच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हलाल प्रमाणपत्र काढल्याची बाब समोर आली आहे. मार्च 2023 मध्ये काढलेले प्रमाणपत्र सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे. प्रमाणपत्राचा आधार घेत गोकुळ दूध संघाला हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का? असा सवाल काही संघटनांनी विचारला. गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांच्या काळातच हे हलाल प्रमाणपत्र काढल्याचा दावा देखील केला जात आहे.
आखाती देशांमध्ये गोकुळच्या उत्पादनांना मागणी
मार्च 2023 मध्ये काढलेलं हे हलाल प्रमाणपत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलं तरी प्रत्यक्षात 2018 पासून गोकुळने हे हलाल प्रमाणपत्र काढल्याचं समोर आलं आहे. आखाती देशांमध्ये गोकुळच्या उत्पादनांना मागणी आहे. मागणीचा पुरवठा करण्यासाठी हलाल पत्र बंधनकारक असल्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे प्रमाणपत्र काढलं होतं. शिवाय दर दोन वर्षांनी या प्रमाणपत्राचे नूतनीकरण होत असल्याची बाब देखील समोर आली आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक पुढे ढकलण्यात अपयश आल्यानेच काहींना असे तथ्यहीन मुद्दे काढावे लागत असल्याची टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत महिन्याभरापूर्वीच संपली आहे. मात्र, गोकुळमधील सत्ताधर्यांनी चुकीच्या पद्धतीने सभासद नोंदणी आणि गैरप्रकार केल्याचा आरोप करत प्रकाश बेलवाडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मुदत संपूनही गोकुळ दूध संघाचे निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आता 90 दिवसाच्या आत गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे हलाल प्रमाणपत्राचा मुद्दा समोर आला आहे. येणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत देखील हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. हलाल प्रमाणपत्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच गोकुळच्या दुधाला धार्मिक रंग चढला आहे.
हलाल म्हणजे काय?
हलाल’ हा अरबी शब्द आहे. मुस्लिम किंवा इस्लाम धर्मानुसार हलाल म्हणजे वैध किंवा ज्याला मान्यता किंवा परवानगी आहे. इस्लाममध्ये हलाल आणि हराम या दोन संज्ञा आहेत. जसे हलालमध्ये धर्मानुसार मान्यता/परवानगी आहे आणि हराम (Haram) म्हणजे जे इस्लामला अमान्य किंवा निषिद्ध असलेल्या गोष्टी आहेत. हलाल किंवा हराम या केवळ खाण्या-पिण्यापुरत्या मर्यादित संकल्पना नाहीत. इस्लाममध्ये त्यांना जीवनशैलीशी जोडलं आहे. काय खाणं योग्य, काय अयोग्य हे हलाल किंवा हराम ठरवलं आहे, तसंच वर्तन, व्यसन, फसवणूक, दान, धर्म, दैनंदिन आचार-विचार हे सुद्धा हलाल-हरामशी जोडलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा