Last Updated:
Argentina Vs Egypt: दोन गोलांनी पिछाडीवर पडलेल्या अर्जेंटिनाने शेवटच्या 15 मिनिटांत जबरदस्त पुनरागमन करत इजिप्तवर 3-2 असा थरारक विजय मिळवला. पेनल्टी चुकवूनही लिओनेल मेस्सीने महत्त्वाचा गोल करत अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली.
अटलांटा (अमेरिका): फिफा विश्वचषक 2026 मधील प्री-क्वार्टरफायनलमध्ये अटलांटा स्टेडियमवर फुटबॉल चाहत्यांना अक्षरशः थराराचा कळस अनुभवायला मिळाला. एका टप्प्यावर दोन गोलांनी पिछाडीवर पडलेला गतविजेता अर्जेंटिना स्पर्धेबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर उभा होता. लिओनेल मेस्सीची पेनल्टी वाचवली गेली होती, इजिप्तचा बचाव अभेद्य वाटत होता आणि मोहम्मद सलाहच्या संघाने मोठा उलटफेर करण्याची स्वप्ने रंगवली होती.
मात्र शेवटच्या अवघ्या 15 मिनिटांत संपूर्ण सामना उलटा फिरला. क्रिस्टियन रोमेरो, लिओनेल मेस्सी आणि एन्झो फर्नांडेझ यांच्या गोलांच्या जोरावर अर्जेंटिनाने अविश्वसनीय पुनरागमन करत 3-2 असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघ सावध खेळत होते. अर्जेंटिनाने चेंडूवरील नियंत्रण राखले तर इजिप्तने प्रतिआक्रमणावर भर दिला. 15व्या मिनिटाला इजिप्तला कॉर्नर मिळाला. मारवान अटियाच्या अचूक क्रॉसवर यासेर इब्राहिम याने जोरदार हेडर मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांमध्ये शांतता पसरली. इजिप्तने 1-0 अशी धक्कादायक आघाडी घेतली.
गोल खाल्ल्यानंतर अर्जेंटिनाने आक्रमणाची तीव्रता वाढवली. 19व्या मिनिटाला निकोलस टाग्लियाफिकोला पेनल्टी बॉक्समध्ये पाडल्याने अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. संपूर्ण स्टेडियमची नजर लिओनेल मेस्सीकडे होती. पण इजिप्तचा गोलरक्षक मोस्तफा शोबेर डावीकडे झेपावत मेस्सीचा फटका रोखला. या बचावामुळे इजिप्तच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला तर अर्जेंटिनाला मोठा मानसिक धक्का बसला.
पहिल्या हाफमध्येच नव्हे तर संपूर्ण सामन्यात शोबेरने अप्रतिम गोलरक्षण केले. अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर, ज्युलियन अल्वारेझ आणि इतर अर्जेंटिनी खेळाडूंचे अनेक प्रयत्न त्याने हाणून पाडले. एका टप्प्यावर अर्जेंटिनाचा फ्री-किक मेस्सीने थेट गोलपोस्टवर मारला, पण चेंडू पोस्टला लागून बाहेर गेला. अर्जेंटिनाचे नशीबही त्यांच्यासोबत नसल्याचे चित्र दिसत होते.
दुसऱ्या हाफमध्ये इजिप्तने पुन्हा एकदा अर्जेंटिनाला हादरवले. 67व्या मिनिटाला मोस्तफा झिको याने गोल करत आघाडी 2-0 अशी केली. गतविजेत्यांचा विश्वचषक प्रवास संपणार, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
सामना हातातून निसटत असल्याचे पाहून अर्जेंटिनाने सर्व ताकद पणाला लावली. 79व्या मिनिटाला क्रिस्टियन रोमेरोने हेडरद्वारे गोल करत अर्जेंटिनाला सामन्यात परत आणले. अवघ्या चार मिनिटांनी 83व्या मिनिटाला मेस्सीने आपल्या शैलीत दमदार हाफ व्हॉली मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला. पेनल्टी चुकवलेल्या मेस्सीने याच गोलने आपल्या चाहत्यांना पुन्हा आनंद दिला.
सामना अतिरिक्त वेळेत जातो की काय, असे वाटत असतानाच अर्जेंटिनाने अखेरचा हल्ला चढवला. बदली खेळाडू लौतारो मार्टिनेझ याने अचूक चेंडू पुढे दिला आणि एन्झो फर्नांडेझ याने 90+3 व्या मिनिटाला हेडरद्वारे विजयी गोल केला. या एका गोलने संपूर्ण सामन्याचे चित्र बदलले आणि अर्जेंटिनाने 3-2 असा थरारक विजय मिळवला.
मोस्तफा शोबेरची शानदार कामगिरी, यासेर इब्राहिम आणि मोस्तफा झिकोचे गोल, तसेच मोहम्मद सलाहचे नेतृत्व असूनही इजिप्तला शेवटच्या काही मिनिटांत हा सामना गमवावा लागला. सामन्याच्या अखेरीस एका संभाव्य पेनल्टीबाबत इजिप्तने आक्षेप घेतला तर त्यांच्या स्टाफमधील एका सदस्याला लाल कार्डही दाखवण्यात आले. या निर्णयांवरही वाद निर्माण झाला.
या विजयासह अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता त्यांचा सामना स्वित्झर्लंड आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 07, 2026 11:55 PM IST
FIFA World Cup 2026: शेवटच्या 11 मिनिटात अर्जेंटिनाने हरणारी मॅच जिंकली, मेस्सीने जगाला दाखवला चॅम्पियन गेम, जिगरबाज इजिप्तचे स्वप्न भंगले!
