Satara News : सातारा जिल्ह्यातील आलवडी गावात भूस्खलनाचा धोका वाढल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
डोंगरावरील काही भाग खाली आल्याने भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण
परळी खोऱ्यात असणारे आलवडी गावात मागील आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या गावात अनेक ठिकाणी जमिनीखालून पाणी वाहत असून आलवडी गावाच्या वरील बाजूचा डोंगरावरील काही भाग खाली आल्याने भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गावातील जमीन खचली तर काही घरांना तडे गेले आहेत. यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली.
नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर, गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनातील तहसीलदार प्रांताधिकारी हे आपल्या टीम समवेत आज सकाळपासून त्या ठिकाणी थांबले आहेत. यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. यानंतर पाटेघर या ठिकाणी दोन हॉलमध्ये गावकऱ्यांसाठी जेवण, लाईट आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
आज दिवसभरात घडलेल्या प्रकारामुळे आलवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांनी मागील दोन वर्षापासून असा बदल गावात पावसाळ्यात दिसून येत असल्याचे सांगून याबाबत जिल्हा प्रशासनाने आमचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.
वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावर आंबोली घाटात दोन भलेमोठे दगड रस्त्यावर कोसळले, वाहतुकीवर परिणाम
वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावर आंबोली घाटात दोन भलेमोठे दगड रस्त्यावर कोसळले आहेत. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आंबोली मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने सुमारे एक किलोमीटर अंतरावर दोन भलेमोठे दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सुदैवाने त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र रस्ता बंद झाल्यामुळे आंबोली घाटात दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तीनसमाळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तीनसमाळ पर्यटन स्थळी जाणाऱ्या घाटातील रस्ता बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे घाटात मोठमोठे दगड कोसळले असून मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा झाला आहे. रात्रीच्या वेळेस दरड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे.