Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया


Dharmendra Pradhan: देशभरात NEET-UG परीक्षेतील कथित घोटाळ्यावरून पेटलेला वणवा आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. “जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे,” अशा शब्दांत स्पष्टीकरण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे.

‘विद्यार्थ्यांचे भविष्य आणि वेळ महत्त्वाचा’  

आपल्या राजीनाम्याचे समर्थन करताना त्यांनी स्पष्ट केले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आणि त्यांचा मौल्यवान वेळ हा कोणत्याही वादापेक्षा मोठा आहे. आंदोलने आणि न्यायालयीन लढायांमध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच ते कोणत्याही कायदेशीर किंवा प्रशासकीय अडचणीत सापडू नयेत, हीच सरकारची प्राथमिकता असायला हवी. विद्यार्थ्यांनी आता सर्व वाद मागे सारून पुन्हा एकदा आपल्या अभ्यासावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा पत्रातील शब्द जसाच्या तसा

मी गेल्या 4 दशकांहून (40 वर्षांहून) अधिक काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी समर्पित राहिलो आहे. एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था हीच एका सशक्त राष्ट्राचा पाया असते, असा माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारताच्या युवा पिढीची स्वप्ने पूर्ण करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिलेला आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो.

परंतु, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेमध्ये काही गैरव्यवहार आणि अनियमितता आढळून आली. भारत सरकारने याची तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे (CBI) सोपवली, ही परीक्षा रद्द केली आणि पुन्हा परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली. यासोबतच पुढील वर्षापासून ही परीक्षा CBT (संगणकावर आधारित परीक्षा) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण काळात, २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी, हीच आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने एकत्र येऊन (Whole of Government Approach) काम केले. यामध्ये केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारे आणि विशेषतः जिल्हा प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळे २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.

घटनाक्रम पाहून माझे मन अत्यंत दुःखी झाले

पहिल्या दिवसापासूनच मी या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही पळ काढला नाही. कोणत्याही हुशार विद्यार्थ्याचे भविष्य परीक्षा माफियांच्या मुळे खराब होऊ देणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असा माझा ठाम संकल्प होता. १६ जुलै रोजी जाहीर झालेले NEET-UG चे निकाल समाधानकारक राहिले, ज्यामध्ये गरीब घरातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना यश मिळाले. परंतु, या काळातही काही जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना भडकवण्याचा आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे माझे मन अत्यंत दुःखी झाले. मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर दृढ विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि तरुणांच्या स्वप्नांचा व अपेक्षांचा आदर करतो. तरुण हे केवळ भारताचे भविष्य नाहीत, तर नव्या आणि विकसित भारताचे निर्माते आहेत. गेल्या १० दिवसांतील घटनाक्रम पाहून माझे मन अत्यंत दुःखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही.

युवाशक्तीला गैरसमजाच्या चक्रात अडकू देणार नाही

भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. या युवाशक्तीला गैरसमजाच्या चक्रात अडकू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे. जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे. मी आदरणीय पंतप्रधानांचे मार्गदर्शन, विश्वास आणि निरंतर सहकार्याबद्दल मनापासून आभार मानतो. तसेच मंत्रिमंडळातील माझे सहकारी, मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, त्या सर्वांचे आभार मानतो. राष्ट्रसेवा ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी त्यासाठी सदैव समर्पित राहीन. प्रभू श्री जगन्नाथांच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारतमाता, ओडिशातील जनता आणि देशातील तरुणांच्या सेवा व स्वप्नपूर्तीसाठी सदैव तत्पर राहीन.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *