CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतावर पुन्हा एकदा डोपिंगचा ठपका, हा खेळाडू स्पर्धेतून आऊटImage Credit source: Getty Images
स्कॉटलँडमधील ग्लासगो 2026 स्पर्धेला 23 जुलैपासून सुरूवात झाली आहे. 11 दिवस असणाऱ्या या स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात खेळाडू पदकासाठी लढत देतील. त्यात भारताकडून 125 खेळाडूंचा चमू सहभागी झाला आहे. त्यात भारताचं 74 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमध्ये पदक निश्चित झालं आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण स्पर्धेपूर्वीच निर्माण झालं होतं. असं असताना भारताच्या प्रतिमेला धक्का लावणारी बातमी समोर आली आहे. कारण या स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंच्या चमूतील एक स्पर्धक डोपिंगच्या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाद करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेसाठी निवडलेल्या 73 किलो वजनी गटात निवडलेल्या ज्युडोपटू अरूण कुमार हा डोप चाचणीत फेल गेला आहे. त्यामुळे आता अरूण कुमार कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
अरूण कुमार नाडा चाचणीत फेल
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरू होती आणि उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज होते. पण या सोहळ्याच्या काही तासाआधी भारतीय क्रीडाप्रेमींना धक्का बसला. कारण ज्युडोपटू अरूण कुमार डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. खरं तर या क्रीडाप्रकारात त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पण डोपिंग चाचणीत पकडला गेल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला तात्काळ संघातून काढून टाकण्यात आलं आहे. या स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी त्याची नाडाकडून डोप टेस्ट करण्यात आली होती. त्यात अरूणचे नमुने पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्याच्या तपासणीत प्रतिबंधित पदार्थ आढळून आले आहेत. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघाने त्याला भारतीय चमून बाहेर काढलं आहे.
भारताच्या तयारीवर वाईट प्रभाव
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतील भारताच्या बाबतीत घडलेला हा काही पहिला प्रकार नाही. काही दिवसांपूर्वी पिस्टल शूटर गौरव कुमार देखील डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला होता. त्यामुळे त्याला या क्रीडाप्रकारातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्यामुळे भारतीय चमूवर त्याचा वाईट प्रभाव पडला होता. असं असताना आता दुसरा धक्का बसला आहे. मोठ्या स्पर्धांपूर्वी असे प्रकार घडल्यानंतर संपूर्ण चमूचं मानसिक खच्चीकरण होतं. आता 73 किलो वजनी गटात अरूण कुमारची जागी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण कमी वेळात सर्व जुळवाजुळव करणं खूपच कठीण आहे.