Child Health: पालकांनो…मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा ब्रेन ट्यूमर माहितीय? ‘ही’ लक्षणं कमी जणांना माहीत, जाणून घ्याच..


Child Health: जसे प्रौढांमध्ये ब्रेन ट्यूमर आढळतात, तसेच ते मुलांमध्येही आढळून येतात. मुलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या ब्रेन ट्युमरबाबत बोलताना तज्ज्ञ सांगतात की, पालकांनी कोणत्याही असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. पुणे येथील अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन अॅण्ड चिल्ड्रन,  पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, डॉ. शिजी चालीपट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

ब्रेन ट्युमर ‘या’ वयोगटातील मुलांना होऊ शकतात? (Child Health)

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ब्रेन ट्युमर कोणत्याही वयोगटातील मुलांना होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी या आजाराच्या लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मेंदूतील गाठ ही तिच्या आकारावर आणि मेंदूमधील स्थानावर अवलंबून असते. सकाळच्या वेळी अधिक तीव्र होणारी सततची डोकेदुखी, कोणतेही स्पष्ट कारण नसताना वारंवार उलट्या होणे, तोल जाणे, चालताना अडचण येणे, धूसर दिसणे, फिट्स (झटके) येणे, वर्तणुकीत बदल होणे, अभ्यासातील प्रगती कमी होणे किंवा नेहमीपेक्षा अधिक झोप येणे ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत. लहान बाळांमध्ये डोक्याचा आकार असामान्य रित्या वाढणे किंवा शारीरिक विकासाचा विकासाची विलंब होणे हीदेखील चिंतेची बाब असून त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरचे अनेक प्रकार…

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरचे अनेक प्रकार आढळतात. त्यापैकी पायलोसाइटिक अॅस्ट्रोसाइटोमा (Pilocytic Astrocytoma) हा सर्वात सामान्य प्रकार मानला जातो. ही गाठ हळूहळू वाढणारी आणि बहुतेक वेळा कर्करोगजन्य नसते. ती प्रामुख्याने मेंदूच्या सेरेबेलम (Cerebellum) भागात विकसित होते, जो शरीराचा तोल आणि समन्वय राखण्याचे कार्य करतो. याशिवाय मेड्युलोब्लास्टोमा (Medulloblastoma) हा वेगाने वाढणारा ट्यूमर, एपेंडायमोमा (Ependymoma) जो मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील द्रवाने भरलेल्या पोकळ्यांमध्ये विकसित होतो, तसेच डिफ्यूज लो-ग्रेड ग्लायोमा (Diffuse Low-Grade Glioma) हा तुलनेने हळूहळू वाढणारा ट्यूमरही मुलांमध्ये आढळून येतो. निदानासाठी मुलाची सविस्तर न्यूरोलॉजिकल तपासणी केली जाते. तसेच ट्युमरचे स्थान आणि आकार समजून घेण्यासाठी एमआरआय (MRI) स्कॅनचा उपयोग केला जातो. काही वेळा गाठीचा नेमका प्रकार निश्चित करण्यासाठी बायोप्सीचीही आवश्यकता भासू शकते.

उपचार कसे केले जातात?

ब्रेन ट्युमरचे निदान झाल्यानंतर तज्ज्ञ डॅाक्टर उपचारांची दिशा ठरवतात. गाठीचा प्रकार, तिचे स्थान आणि मुलाची एकूण प्रकृती यानुसार उपचार योजना आखली जाते. शस्त्रक्रियेच्या मदतीने गाठ सुरक्षितपणे काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी हालचाल करणे, बोलणे, दृष्टी आणि शिकण्याची क्षमता यांसारख्या मेंदूच्या महत्त्वाच्या कार्यांचे संरक्षण करण्यावर विशेष भर दिला जातो.

शंका असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या…

आजच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मेंदूच्या गाठींवर अधिक सुरक्षित आणि अचूक उपचार करणे शक्य झाले आहे. न्यूरोनॅव्हिगेशन, इंट्राऑपरेटिव्ह मॉनिटरिंग आणि हाय-प्रिसिजन इमेजिंग यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया अधिक प्रभावीपणे केली जाते. मुलांमध्ये वरील कोणतीही लक्षणे दिसल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच निदान आणि योग्य उपचारांमुळे मुलांच्या जीवनमानात चांगला बदल होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही शंका असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा

एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं? 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *