Alia Bhatt on NEET Paper Leak: नीट पेपर फुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. अनेक बॉलिवूड कलाकार अनेकजण विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी दिल्लीत जंतरमंतरला पाहोचले होते. पण, अनेकांनी मौन बाळगणंच पसंत केलं. काहींनी विरोध केला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अभिनेत्री आलिया भट्टने मौन सोडलं असून तिची पोस्ट सध्या चर्चेत आहे. उद्याचा भारत घडवणाऱ्या तरुणांचा आवाज आपण खरंच ऐकतो आहोत का? असं म्हणत सवाल केलाय.
नेमकं काय म्हणाली आलिया भट्ट?
अभिनेत्री आलिया भट्टने दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये ती म्हणाली, ‘ गेल्या काही दिवसांपासून माझं मन अनेकदा मोडलं, अन् पुन्हा पुन्हा आशेने सावरलंही. आपल्या हक्कासाठी ठामपणे उभ्या असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक स्वप्न आहे, एका कुंदुंबाची आशा आहे आणि असंख्य त्यागाने भरलेला प्रवास आहे. ते फक्त स्वतःचा प्रतिनिधित्व करत नाहीत, तर ज्यांनी त्यांना साथ दिली, त्यांच्याही अपेक्षांचे ओझं ते पेलत आहेत. याबरोबर ते पुढील पिढ्यांसाठी अधिक चांगला मार्ग तयार करत आहेत. या सगळ्यांच्या धैर्यापुढे मी नम्र झालेय. त्यांचा निर्धार आपल्यासमोर एक आरसा बनवून उभा राहतोय आणि आपल्यालाच प्रश्न विचारतोय -उद्याचा भारत घडवणाऱ्या या तरुणांचा आवाज आपण खरंच ऐकतो आहोत का? विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांकडून .. भविष्य त्यांचंच आहे. जय हिंद’ असं आलिया भट्ट म्हणालीय.
देशाला हादरवून टाकणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर ते संसद भवन परिसरात आंदोलन छेडलं. या आंदोलनाला मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी पाठिंबा दिला. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी समोर आले.शबाना आजमी ते प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभाग घेतला. दिल्लीतील आंदोलनानंतर देशभरात विद्यार्थी आंदोलनांना सुरुवात झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.