Last Updated:
याच सेवाभावातून पुण्यातील हडपसर येथील चित्रकार विशाल केदारी गेल्या पाच वर्षांपासून पालखी रथासाठी आकर्षक पेंटिंग तयार करून माऊलींच्या चरणी आपली कला अर्पण करत आहेत.
पुणे : आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती, परंपरा आणि सेवाभावाचा उत्सव. लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या वारीत प्रत्येक जण आपल्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. याच सेवाभावातून पुण्यातील हडपसर येथील चित्रकार विशाल केदारी गेल्या पाच वर्षांपासून पालखी रथासाठी आकर्षक पेंटिंग तयार करून माऊलींच्या चरणी आपली कला अर्पण करत आहेत.
यंदाही देहू आणि आळंदीहून निघालेल्या संतांच्या पालखी रथाच्या सजावटीसाठी विशाल केदारी यांनी वॉटरप्रूफ प्लायवूडवर अॅक्रेलिक रंगांच्या सहाय्याने देखणी चित्रे साकारली आहेत. या चित्रांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे फेट्यातील बालरूप, समाधीस्थ माऊली तसेच संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा प्रसंग अत्यंत भावपूर्ण पद्धतीने रेखाटण्यात आला आहे. पालखी रथाच्या अग्रभागी लावण्यात येतात ही चित्रे लाखो वारकरी आणि भाविकांचे लक्ष वेधून घेत असून सोशल मीडियावरही त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते.
मूळचे वानवडी येथील असलेले विशाल केदारी गेली वीस वर्षे हडपसरमध्ये वास्तव्यास आहेत. ते स्वतः तब्बल 17 वर्षे नियमित वारी करत असून लहानपणापासूनच वारीबद्दल त्यांना विशेष आकर्षण आहे. वारीमध्ये आपणही काहीतरी योगदान द्यावे, या भावनेतून त्यांनी सुरुवातीला रांगोळी काढणे आणि फुलांच्या सजावटीत सहभाग घेणे सुरू केले. त्यानंतर त्यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून पालखी रथ सजविण्याचा संकल्प केला.
विशाल केदारी सांगतात की, पालखी रथावरील प्रत्येक चित्र तयार करताना धार्मिक संदर्भ, संतांचे व्यक्तिमत्त्व आणि वारकऱ्यांच्या भावना यांचा बारकाईने अभ्यास केला जातो. पावसाळ्यातही चित्रांचे नुकसान होऊ नये म्हणून वॉटरप्रूफ प्लायवूड आणि दर्जेदार अॅक्रेलिक रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे संपूर्ण वारीदरम्यान ही चित्रे सुरक्षित राहतात.
विशेष म्हणजे या सेवेबद्दल विशाल केदारी कोणतेही मानधन स्वीकारत नाहीत. जशी फुलांची सेवा करणारे स्वयंसेवक निस्वार्थपणे काम करतात, तशीच माझी ही माऊलींच्या चरणी अर्पण केलेली कला आहे. ही सेवा पैशासाठी नाही, तर भक्ती आणि समाधानासाठी आहे, असे ते सांगतात.
औपचारिक शिक्षण दहावीपर्यंतच झाले असले तरी स्वतःच्या जिद्दीच्या बळावर त्यांनी चित्रकलेत प्राविण्य मिळवले. आज त्यांची चित्रे केवळ वारकऱ्यांनाच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशातील भाविकांनाही भावत आहेत. यापूर्वी त्यांच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बालरूपातील चित्राला मोठी लोकप्रियता मिळाली होती.
आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवाभाव, समर्पण आणि भक्तीचा महोत्सव आहे. विशाल केदारी यांच्यासारखे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून या परंपरेत मोलाची भर घालत आहेत. जोपर्यंत हातात रंग आणि ब्रश आहे, तोपर्यंत माऊलींच्या सेवेसाठी चित्रे काढत राहणार, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी ही सेवा आयुष्यभर सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Pune,Maharashtra
Jun 30, 2026 12:34 PM IST
सेवाभाव, समर्पण आणि श्रद्धा, पुणेकर विशाल यांच्या हातात जादू, माऊलींच्या पालखीसाठी अनोखी सेवा, Video