मुंबई : शिवसेना (Shivsena) उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन, जाहीर सभांतून जोरदार हल्लाबोल केला. धाराशिवमधील सभेत, आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? असे म्हणत ओमराजेंच्याच भाषणाचा दाखला खरपूस समाचार घेतला. त्यानंतर, आज शिर्डी मतदारसंघात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर निशाणा साधत आपल्या दौऱ्याचा शेवट केला. या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खासदारांवर आणि भाजप-शिंदेसेनेवर टीका केली. यावेळी, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदेंना (Shrikant shinde) कार्ट असं त्यांनी म्हटलं. आता, उद्धव ठाकरेंच्या या टिकेला शिंदेंच्या शिवसेनेनं उत्तर दिलं आहे.
शिर्डीत उद्धव ठाकरेनी पत्रकार परिषेदतून भाजपसह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. शिवसेना एकच असून ती बाळासाहेबांची आहे, दुसरी शाहसेना असून एकनाथ शिंदेंना अमित शाहांनी सुपारी दिल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, यावेळी केंद्रीयमंत्री मंडळाचा विस्तार होणार असून श्रीकांत शिंदेंना कॅबिनेटमंत्रीपदी संधी देण्यात येईल, असा प्रश्न पत्रकाराकडून उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत, लायकी नसली तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे ही शाहसेनच्या प्रमुखाची इच्छा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या नेटीझन्सकडून उद्धव ठाकरेंना ट्रोल केलं जात आहे. तर, आता खासदार नरेश म्हस्के यांनी या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे.
शेंबड्या पोराला आमदार केलं
श्रीकांत शिंदे हे तीन वेळेचे खासदार आहेत, लाखोंच्या फरकाने ते निवडून आले आहेत. खासदार होताना कुणाचाही बळी दिलेला नाही, याउलट श्रीकांत शिंदेंना जर कार्ट म्हणत असाल तर तुमचं शेंबडं पोरगं, त्याला शेंबूडही काढता येत नव्हता, तेव्हा दुसऱ्याच्या मतदारसंघात त्याला उभं केलं, असा पलटवार नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर केला. सुनील शिंदेसारख्या कार्यकर्त्याचा बळी दिला. सचिन अहिरसारखा राष्ट्रवादीतून उभा राहिल म्हणून त्याला शब्द दिला. किशोरी पेडणेकरांना घरी बसवलं, तीन-तीन लोकांचा बळी देऊन आपल्या शेंबड्या पोराला आपण आमदार बनवलं. एकनाथ शिंदे घरोघरी, दारोदारी फिरलं म्हणून आपलं शेंबडं पोरगं आमदार बनलं, अशा शब्दात नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली.
हेही वाचा
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा