भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली. दोन सामन्यांची मालिका आयर्लंड संघाने जिंकली. आता यानंतर भारतीय संघावर अनेक टीका झाल्या. सलग दोनवेळा विश्वचषक जिंकलेल्या संघाची अशी अवस्था पाहून सर्वतच माध्यमातून टीका होत आहे. भारतीय संघाची इतकी मजूबत बाजू असूनही त्यांना आयर्लंडविरुद्ध एकही सामना जिंकता न आल्याने मोठी नामुष्की ओढवली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्.ात 155 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ केवळ 153 धावाच करू शकला. हर्षित राणाने शेवटच्या षटकात 10 चेंडूंमध्ये 21 धावा करून आशा पल्लवित केली, पण पाचव्या चेंडूवर तोही बाद झाला. भारताविरुद्ध आयर्लंडचा हा पहिला मालिका विजय आहे पण या मालिकेतील पराभवानंतरही भारतीय संघासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
दरम्यान, आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025-27 च्या गुणतालिकेत मोठे उलथापालथ झाली आहे. अँटिग्वा येथे वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या निकालाने गुणतालिकेत पूर्णपणे बदल घडवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने शानदार कामगिरी करत श्रीलंकेला एक डाव आणि 217 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. श्रीलंकेच्या या मानहानीकारक पराभवाचा थेट फायदा भारतीय क्रिकेट संघाला झाला असून, तो गुणतालिकेत एका स्थानाने वर सरकला आहे.
अँटिग्वा कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंकेच्या संघाने 308 धावा केल्या. आमिर जांगूच्या ऐतिहासिक द्विशतक आणि रॉस्टन चेसच्या 194 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 9 गडी गमावून 626 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ पूर्णपणे कोसळला. दुसऱ्या डावात, केमार रोच आणि जेडन सील्स यांच्या भेदक गोलंदाजीसमोर संपूर्ण श्रीलंकन संघ केवळ 101 धावांवर गारद झाला.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025-27 मधील श्रीलंकेने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले असून, त्यापैकी एकात विजय मिळवला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यापूर्वी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत श्रीलंकेचे तिसरे स्थान भक्कम होते. मात्र, या दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या गुणांची टक्केवारी लक्षणीयरीत्या घसरली आहे. 44.44 गुणांच्या टक्केवारीसह ते सहाव्या स्थानावर घसरले आहेत. दरम्यान, भारतीय संघ या सामन्यापूर्वी सहाव्या स्थानावर होता. मात्र, त्यांची गुणांची टक्केवारी 48.15 असून, ते पाचव्या स्थानावर फेकले गेले आहेत. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा नऊ सामन्यांमधील हा पहिला विजय असून, ते 14.81 गुणांच्या टक्केवारीसह आठव्या स्थानावर आहेत. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया 87.50 च्या उत्कृष्ट गुणांच्या टक्केवारीसह अजूनही पहिल्या स्थानावर कायम आहे.