Vat Purnima 2026: महिला ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होत्या.. तो दिवस अखेर जवळ आला आहे. वटपौर्णिमा…सौभाग्य… पती-पत्नीतील प्रेम… निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या (वट) वृक्षाची पूजा करून व्रत करतात. या दिवशी शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मात्र यापैकी 2 तास असे आहेत, ज्या वेळेत महिलांना वटपूजा टाळली पाहिजे. काय आहे यामागे पारंपरिक समजूत आणि धार्मिक मान्यता…
वडाचे झाड – दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक! (Vat Purnima 2026)
वटपौर्णिमेचा संदेश म्हणजे वैवाहिक नात्यातील विश्वास, परस्पर आदर, संयम आणि अखंड साथ यांचे महत्त्व जपणे होय. वटपौर्णिमा या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हा दिवस पती-पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून महिलांकडून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दोरा बांधला जातो आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.
वटपौर्णिमा 2026 तिथी
वैदिक पंचांगानुसार, यंदा वटपौर्णिमा उदयतिथीनुसार सोमवार, 29 जून 2026 रोजी साजरी केली जाईल.
पौर्णिमा तिथी प्रारंभ: 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 वाजता.
पौर्णिमा तिथी समाप्ती: 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 वाजता.
पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त…
वैदिक पंचांगानुसार, यंदा 29 जून रोजी सकाळी 06:30 ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. शास्त्रांनुसार, वटपौर्णिमेची मुख्य पूजा करण्यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी आणि सर्वोत्तम मानली गेली आहे. या 6 तासांच्या शुभ मुहूर्तात महिला आपली पूजा पूर्ण करू शकतात.
वटपौर्णिमेला ‘या’ वेळेत पूजा करणे टाळा
पारंपरिक समजुतींनुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार, 29 जून रोजी दुपारी 12:30 ते दुपारी 2:30 या 2 तासांच्या कालावधीत वडाच्या झाडाची पूजा करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे महिलांनी या दुपारच्या वेळेत पूजेचे विधी करणे टाळावे.
पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य
- हळद, कुंकू, अक्षता (तांदूळ), फुले आणि तेलाचा किंवा तुपाचा दिवा.
- वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा किंवा पवित्र रक्षासूत्र.
- बांगड्या, मंगळसूत्र आणि सौभाग्याचे इतर अलंकार.
- विड्याची पाने, पाण्याने भरलेला तांब्याचा कलश, आंबे आणि इतर 5 प्रकारची फळे..
वटपौर्णिमा पूजा पद्धत
- पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ, शक्यतो पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत.
- पूजा साहित्य तयार ठेवावे – हळद, कुंकू, अक्षता, फुले, फळे, अगरबत्ती, दीप, नैवेद्य, कापसाचा दोरा आणि पाण्याचा कलश.
- वडाच्या (वट) वृक्षाजवळ जाऊन त्याला जल अर्पण करावे.
- वडाच्या झाडाला हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून दीप आणि अगरबत्ती लावावी.
- सावित्री-सत्यवान यांचे स्मरण करून वटवृक्षाची मनोभावे पूजा करावी.
- वडाच्या झाडाभोवती कापसाचा दोरा गुंडाळत 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे.
- पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुखी संसार आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
- पूजा पूर्ण झाल्यानंतर व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी, आरती करून नैवेद्य अर्पण करावा.
- वडाच्या वृक्षाला आणि उपस्थित सुवासिनींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
- त्यानंतर प्रसाद वाटून व्रताची सांगता करावी.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस…इच्छापूर्ती…डबल लाभ…5 राशींचं नशीब फळफळलं! पॉवरफुल हंस राजयोगाचा इफेक्ट! संपत्तीचा मार्ग मोकळा, तुमची रास?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी