Last Updated:
सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी फोक्सवॅगन आणखी मोठ्या पुनर्रचनेच्या तयारीत असून तब्बल 1 लाख नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी दिल्ली : युरोपमधील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी फोक्सवॅगन एजी (Volkswagen AG) आणखी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत असून स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी जर्मनीतील काही कारखानेही बंद करण्याचा विचार करत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ऑलिव्हर ब्लूम (Oliver Blume) यांनी ही पुनर्रचना योजना कंपनीच्या व्यवस्थापन मंडळासमोर मांडल्याचे मॅनेजर मॅगझिनने आपल्या अहवालात म्हटले आहे.
शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार ऑलिव्हर ब्लूम यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या कर्मचारी कपातीच्या योजनेत मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आधी जाहीर करण्यात आलेल्या कपातीच्या तुलनेत आता कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट कमी करून ती एक लाखांपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. सध्या फोक्सवॅगन समूहात सुमारे 6 लाख 57 हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
ऑलिव्हर ब्लूम यांची ही नवीन पुनर्रचना योजना पुढील महिन्यात कंपनीच्या पर्यवेक्षण मंडळासमोर (Supervisory Board) चर्चेसाठी ठेवली जाणार आहे. मात्र फोक्सवॅगनमध्ये अशा प्रकारच्या योजनांमध्ये अनेकदा बदल करावे लागतात. कारण पर्यवेक्षण मंडळातील निम्मे सदस्य हे कामगार प्रतिनिधी आहेत. त्यामुळे कर्मचारी कपातीच्या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहवालानुसार ऑलिव्हर ब्लूम यांच्या धोरणामध्ये दशकाच्या अखेरीपर्यंत कंपनीच्या प्रशासकीय आणि इतर सर्वसाधारण खर्चात 11 अब्ज युरो (सुमारे 12.5 अब्ज डॉलर) इतकी कपात करण्याचाही समावेश आहे. याशिवाय मध्यम कालावधीत जर्मनीतील चार कारखाने बंद करण्याची तयारी सुरू आहे.
बंद होण्याची शक्यता असलेल्या कारखान्यांमध्ये ऑडीचा नेकार्सुल्म (Neckarsulm) येथील कारखाना, फोक्सवॅगनचा हॅनोव्हर (Hanover) कारखाना, झ्विकाऊ (Zwickau) येथील उत्पादन केंद्र, एम्डेन (Emden) येथील कारखाण्याचा समावेश असल्याचे अहवालात म्हटले आहे:
अहवालानुसार ऑलिव्हर ब्लूम कंपनीला अधिक कार्यक्षम आणि खर्चिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी काही महत्त्वाचे संरचनात्मक बदल करण्याचाही विचार करत आहेत. यामध्ये कंपनीच्या कॉम्पोनंट्स (Parts) विभागाला स्वतंत्र करणे, तसेच फोक्सवॅगनच्या मुख्य ‘VW’ ब्रँडलाही स्वतंत्र संरचनेत आणण्याचा विचार सुरू आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, फोक्सवॅगनचा मुख्य ब्रँड अनेक वर्षांपासून कमी नफ्याच्या समस्येचा सामना करत आहे.
फोक्सवॅगनच्या प्रवक्त्याने या वृत्तावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, फोक्सवॅगनमध्ये मूलभूत आणि व्यापक बदल होणे आवश्यक आहे. मात्र मॅनेजर मॅगझिनच्या अहवालातील विशिष्ट दाव्यांवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीचे कार्यकारी मंडळ गेल्या काही महिन्यांपासून भविष्यातील गरजांनुसार कंपनीची पुनर्रचना करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यावर काम करत आहे.
ऑलिव्हर ब्लूम गेल्या काही काळापासून फोक्सवॅगन समूहाचा आकार कमी करून कंपनी अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या कंपनीसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. यामध्ये अमेरिकेने लागू केलेले आयात शुल्क (Tariffs), चीनमधील सततची कमकुवत मागणी आणि युरोपियन बाजारात BYD आणि Stellantis सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून वाढती स्पर्धा यांचा समावेश आहे.
ऑलिव्हर ब्लूम यांनी पुनर्रचनेच्या प्रक्रियेत काही महत्त्वाची पावले आधीच उचलली आहेत. कंपनीने निधी उभारण्यासाठी आपल्या Everllence या मरीन इंजिन व्यवसायातील 51 टक्के हिस्सा विकला आहे. याशिवाय सुमारे 28 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनी सोडण्यास सहमती दर्शवली आहे. हे 2030 पर्यंत समूहातील एकूण 50 हजार कर्मचारी कमी करण्याच्या आधीच जाहीर करण्यात आलेल्या योजनेचा भाग आहे. तसेच कंपनीने वार्षिक उत्पादन क्षमता 1 कोटी 20 लाख वाहनांवरून घटवून सुमारे 90 लाख वाहनांपर्यंत आणली आहे.
फोक्सवॅगनच्या नव्या योजनांना कामगार संघटनांनी तात्काळ विरोध दर्शवला आहे. कंपनीची वर्क्स कौन्सिल आणि IG Metall या कामगार संघटनेने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या योजना कंपनीतील कर्मचारी आणि ज्या प्रदेशांमध्ये फोक्सवॅगनचे कारखाने आहेत तेथील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहेत. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर अशा योजना पुढे रेटल्या गेल्या. तर आम्ही त्याला आमच्या पूर्ण ताकदीने विरोध करू.
फोक्सवॅगनमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणे सोपे नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीच्या पर्यवेक्षण मंडळातील निम्म्या जागा कामगार प्रतिनिधींकडे आहेत. याशिवाय जर्मनीतील लोअर सॅक्सनी (Lower Saxony) राज्य सरकारचेही या मंडळावर दोन प्रतिनिधी आहेत. हे सरकार अनेकदा कामगार संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा देत असल्याने कंपनीच्या पुनर्रचना योजनांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 27, 2026 10:47 PM IST
‘आम्ही कारखाना बंद करतोय’; ऑटो सेक्टरमध्ये भूकंप, 1 लाख कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, सर्वात मोठ्या ब्रँडमधील कामगारांवर कुऱ्हाड
