आईची शपथ घेऊनही गद्दारी केली, उद्धव ठाकरेंनी झोडपले, फुटीर खासदार संजय देशमुख म्हणाले…. | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

सहा खासदारांनी फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटीर आमदारांच्या मतदारसंघात दौरा करण्याचे ठरवले असून आज वाशिम यवतमाळ मतदारसंघात त्यांनी निष्ठा सभा घेतली.

संजय देशमुख-उद्धव ठाकरे
संजय देशमुख-उद्धव ठाकरे

संजय मेहेरे, प्रतिनिधी यवतमाळ, वाशिम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशिम-यवतमाळमध्ये येऊन फुटीर खासदार संजय देशमुख यांच्याविरोधात वात पेटवली. आईची शपथ घेऊनही गद्दारी केली, त्यांच्या आईला आता काय वाटत असेल? अशी भावनिक साद घालत निवडणुकीत गद्दार देशमुख पडलाच पाहिजे, असे आक्रमक शब्द वापरले. त्यावर पलटवार करताना आत्ता मतदारसंघात येऊन काय फायदा आहे, नगरपालिका-जिल्हा परिषद निवडणुकांत का आला नाहीत? असे खासदार देशमुख म्हणाले.

सहा खासदारांनी फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटीर आमदारांच्या मतदारसंघात दौरा करण्याचे ठरवले असून आज वाशिम यवतमाळ मतदारसंघात त्यांनी निष्ठा सभा घेतली. या सभेला हजारो लोकांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या सभेवर खासदार संजय देशमुख यांनी जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर फुटीर खासदार संजय देशमुख यांचा पलटवार

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या सभेत मी आईची शपथ घेतली होती, असा उल्लेख केला. मात्र हे असत्य आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत जाण्याबाबत घरातील लोकांचा सल्ला घेतला होता मात्र कोणाचीही शपथ घेतली नाही, असे देशमुख म्हणाले.

उद्धव ठाकरे चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगत आहे. मी त्यांची सभा बघितली. सभेतील मंडळी पाहता लोकांचा आमच्यावर रोष दिसत नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरून शिंदे सेनेत गेलो आहे. निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे इकडे आले नाही. शिवाय पाठबळही दिले नाही, असा पलटवार खासदार संजय देशमुख यांनी केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

खासदार संजय देशमुख यांनी याआधीही गद्दारी केली होती. तरीही आम्ही पुन्हा त्यांना सोबत घेतले. यांनी आईची शपथ घेऊन पुन्हा पक्ष बदल करणार नाही, असे सांगितले. मात्र त्यांनी आईची शपथ घेऊनही पक्षबदल केला. त्यांच्या आईला आता काय वाटत असेल? त्यांनी मुलीच्या सोयरिकीचा मुद्दा सांगून बैठकीला दांडी मारली, मात्र हा मुलीची नाही तर स्वत:साठी खोक्यांची सोयरिक जुळवत होता, असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्यावर केला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *