TET Paper Leak: महाराष्ट्र राज्य शिक्षण पात्रता परीक्षेची (TET) प्रश्नपत्रिका विकण्याच्या उद्देशाने आलेल्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे पोलिसांच्या भिवंडी परिमंडळ-२ च्या पथकाला मोठे यश आलं आहे. उद्या, म्हणजेच 28 जून 2026 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या अवघ्या काही तास आधीच पोलिसांनी कोंनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून तीन जणांना रंगेहाथ अटक केली. आरोपींकडून TET परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली असून, शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही प्रश्नपत्रिका खरी असल्याचे सांगितले.
थेट बिहार आणि हरियाणा कनेक्शन
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची पार्श्वभूमी पाहता या पेपर फुटीचे धागेदोरे थेट परराज्यांत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन जण बिहारचे तर एक जण हरियाणाचा रहिवासी आहे. मुख्य आरोपी अजूनही फरार पोलिस आयुक्त म्हणाले, कोनगाव पोलिस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली असून 3 जण पेपर विकायला आले होते. त्यांच्या झडतीत 4 सेट पेपर मिळालेत. त्यांच्याकडून मोबाईल डेबिट कार्ड मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, दीड कोटी रुपयांना हा पेपर विकत होते. या तपासासाठी स्पेशल SIT नेमली आहे. यांनी इतर ठिकाणी पेपर विकले असून मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. चौकशीत त्यांना कुठून पेपर मिळाला हे कळेल. सर्व शक्यता गृहित धरून कोचिंग सेंटर आणि सर्वांची चौकशी केली जाणार आहे, असेही ते म्हणाले. प्राथमिक तपासात शिक्षण विभागाचा सहभाग आढळला नाही, असे त्याने सांगितले.
गुप्त माहिती ठरली दिशादर्शक
भिवंडी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. पवन बनसोड यांना 27 जून रोजी एक अत्यंत गोपनीय आणि खात्रीशीर माहिती मिळाली होती. काही इसम 28 जून रोजी होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर विकण्यासाठी भिवंडी भागात येणार असल्याची ती माहिती होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पवन बनसोड यांनी तत्काळ पोलिसांची विविध विशेष पथके तयार केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंनगाव परिसरात तातडीने सापळा रचला आणि संशयितरीत्या वावरणाऱ्या ३ इसमांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे TET परीक्षेची प्रश्नपत्रिका आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून या प्रश्नपत्रिकेची शहानिशा केली. अधिकाऱ्यांनी ही प्रश्नपत्रिका उद्याच्या परीक्षेचीच असल्याचे स्पष्ट करताच पोलिसांनी तिघांनाही जागेवरच अटक केली.
तपासासाठी SIT स्थापन
हा घोटाळा अत्यंत संवेदनशील आणि राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेला असल्याने, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एक ‘विशेष तपास पथक’ स्थापन करण्यात आले आहे. या ‘SIT’ चे नेतृत्व स्वतः पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड करत असून, त्यांच्यासोबत सचिन सांगळे, डी. विजय मराठे यांच्यासह इतर 9 पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. ही आंतरराज्य टोळी महाराष्ट्रात कोणाच्या संपर्कात होती? त्यांनी ही गोपनीय प्रश्नपत्रिका मुख्य केंद्रातून किंवा छपाईच्या ठिकाणाहून कशी मिळवली? आणि आतापर्यंत महाराष्ट्रातील किती उमेदवारांना ती विकली गेली आहे? तसेच यासाठी किती रुपयांचे व्यवहार झाले आहेत? याचा कसून शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके परराज्यात आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत रवाना करण्यात आली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ