India vs Ireland 1st T20I Turning Point : दोन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने बलाढ्य आणि विद्यमान टी-20 विश्वविजेत्या भारताला 34 धावांनी नमवून नवा इतिहास रचला आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध आयर्लंडचा हा पहिलाच विजय आहे. पदार्पण करणाऱ्या मॅट हॉलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे आणि फलंदाजांच्या आक्रमक खेळामुळे आयर्लंडने मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकर याने 36 चेंडूंत 50 धावांची खेळी केली.
आयर्लंडची खराब सुरुवात, पण नंतर जोरदार कमबॅक (India vs Ireland 1st T20I)
टॉस गमावून पहिल्यांदा फलंदाजी करताना आयर्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. 7.1 षटकांत अवघ्या 51 धावांवर त्यांचे 4 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते. पण, या कठीण परिस्थितीत कर्णधार लॉर्कन टकर आणि गॅरेथ डेलानी यांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. 15 व्या षटकात हर्षित राणाने जेव्हा टकरला बाद केले, तेव्हा आयर्लंड 150 धावांपर्यंतच पोहोचेल असे वाटत होते. मात्र, त्यानंतरच्या दोन षटकांनी सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. वाशिंग्टन सुंदरच्या एका षटकात जॉर्ज डॉकरेलने जोरदार फटकेबाजी करत 19 धावा वसूल केल्या.
प्रसिद्ध कृष्णाची ‘ती’ चूक भारताला पडली महाग! (Prasidh Krishna IND vs IRE 1st T20)
सुंदरच्या महागड्या षटकानंतर कर्णधाराने आपला मुख्य गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या हाती चेंडू सोपवला. प्रसिद्ध सामान्यतः हार्ड लेंथवर वेगाने गोलंदाजी करतो, पण या षटकात त्याने स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला. हाच डाव त्याच्यावर उलटला. मार पडत असूनही त्याने आपली रणनीती बदलली नाही. याचा पूर्ण फायदा घेत गॅरेथ डेलानीने प्रसिद्धच्या शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले.
सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट (Prasidh Krishna 17th Over Match Turning Point)
प्रसिद्ध कृष्णाने या एकाच षटकात तब्बल 27 धावा दिल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंडविरुद्ध कोणत्याही भारतीय गोलंदाजाने टाकलेले हे सर्वात महागडे षटक ठरले. जो स्कोअर 150 च्या आसपास थांबेल असे वाटत होते, तो या षटकामुळे थेट 164 वर पोहोचला आणि आयर्लंडने 9 बाद 182 धावांचा डोंगर उभा केला.
भारतीय फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली
183 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अत्यंत सुमार कामगिरी केली. सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 20 चेंडूंत 50 धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली खरी, पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणाचीही साथ लाभली नाही. भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ 18.5 षटकांत अवघ्या 148 धावांवर गारद झाला.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला