…पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय


परभणी: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज परभणीत राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य आणि देशातील अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. राज्यात राजकीय पक्षातील फोडाफोडीवरही त्यांनी भाष्य केलं, तर आमचे खासदार कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. ”ते आमच्या खासदारांच्या संपर्कात असू शकतात, पण आमचे खासदार फुटणार नाहीत”, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना धक्का देत उबाठा शिवसेनेच्या सहा खासदारांचा गट फोडला. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन हे सर्व खासदार, हे वाघ मूळ शिवसेनेत आल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटले. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता राष्ट्रवादीतही खासदार फुटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यासंदर्भाने आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.  

रोहित पवार म्हणाले, “आमच्या खासदारांच्या संपर्कात भाजप किंवा शिंदे गट असू शकतात, पण ते फुटणार नाहीत. भाजपला डी-लिमिटेशन आणि कायदा मंजूर करून घ्यायचा असल्याने ते खासदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ”त्यांनी दावा केला की, राज्यातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याला केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार असून एका छोट्या नेत्याला राज्याची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच फुटलेल्या सहा खासदारांपैकी एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते”, असे रोहित पवार यांनी म्हटले. 

बच्चू कडू पूर्वीसारखे आक्रमक राहिले नाहीत

शेतकरी प्रश्नांवर बोलताना पवार म्हणाले की, बच्चू कडू यांनी अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला असला तरी ते पूर्वीसारखे आक्रमक दिसत नाहीत. खतांच्या वाढलेल्या किंमती, बँकांकडून मिळत नसलेले कर्ज आणि घटलेले पीक कर्ज वितरण यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत, त्यांनी आमच्या आंदोलनात यावे असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. राम मंदिर निधी, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणि खासदार फोडण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याचे गंभीर आरोप देखील त्यांनी केले. तसेच, त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, चौकशी केवळ नावापुरती सुरू असल्याचं ते म्हणाले. 

हेही वाचा

अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *