Vaibhav Sooryavanshi: फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यावी…आयर्लंडविरुद्ध धुमाकुळ घालण्यासाठी वैभवला द्रविडकडून मिळाला लाखमोलाचा सल्ला – Marathi News | Rahul dravid advice to vaibhav sooryavanshi ahead of india vs ireland t20 series


भारतीय क्रिकेटचा तारा, वैभव सूर्यवंशी आणखी एक मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वयातच, त्याने ज्युनियर क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट, इंडिया ‘अ’ संघ आणि आयपीएलमधील आपल्या प्रभावी कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे. त्याची भारतीय टी-20 संघातही निवड झाली आहे. भारत 26 जून रोजी म्हणजेच आजच आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. असे मानले जात आहे की, वैभव या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. जर त्याने असे केले, तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल.  वैभवने जर पदार्पण केले तर तो सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडेल. आता वैभवकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील. आता वैभवची प्रतिभा ओळखून ज्यांनी त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली ते राहुल द्रविड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही वैभवची प्रशंसा केली आहे. वैभव सूर्यवंशीने द्रविडच्या प्रशिक्षणाखाली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. द्रविडने बीबीसीला सांगितले, “वैभवमध्ये गोलंदाजाचा वेग पटकन ओळखण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे क्रिकेटची समज आणि निर्भयता देखील आहे. या गुणांचे परिपूर्ण मिश्रण त्याला खास बनवते. सूर्यवंशीसारखा खेळाडू घडवण्यासाठी कोणताही निश्चित फॉर्म्युला नाही. काही प्रतिभा जन्मजात असतात आणि वैभव त्यापैकीच एक खेळाडू आहे.

राहुल द्रविडचा विश्वास आहे की, “वैभवचे यश केवळ त्याच्या प्रतिभेचा परिणाम नाही. या तरुण फलंदाजाने आपले तंत्र आणि खेळ सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याने लहानपणापासून खूप सराव केला आहे आणि हजारो चेंडू खेळले आहेत. राजस्थान रॉयल्ससोबतच्या माझ्या कार्यकाळात मी त्याची मेहनत जवळून पाहिली आहे.”

वैभवला काळजीची गरज
राहुल द्रविडने असेही सांगितले की, “वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. मला आशा आहे की त्याला योग्य पाठिंबा मिळेल जेणेकरून तो आपली पूर्ण क्षमता गाठू शकेल. अशा खेळाडूची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, पण त्याच वेळी त्याला मुक्तपणे खेळण्याचे आणि प्रगती करण्याचे स्वातंत्र्यही दिले पाहिजे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *