Ashok Samel Ani Kashinath Ghanekar Worst Movie: ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ (Ani… Dr. Kashinath Ghanekar) हा 2018 साली प्रदर्शित झालेला चरित्रपट असून मराठी रंगभूमीवरील (Marathi Theatre) पहिले सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. काशिनाथ घाणेकर (Dr. Kashinath Ghanekar) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अभिजित देशपांडे (Abhijeet Deshpande) यांनी केलंय. या सिनेमात सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी डॉ. घाणेकर यांची प्रमुख भूमिका साकारलेली. मराठीतला हा सिनेमा प्रचंड गाजला आणि सुबोध भावेच्या अभिनयाचंही विशेष कौतुक केलं गेलं. पण आता कित्येक वर्षांनी ज्येष् अभिनेते आणि दिग्दर्शक अशोक समेळ यांनी या सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अशोक समेळ यांनी ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमाबाबत म्हटलंय की, हा सिनेमा अत्यंत वाईट आणि खोटा होता. अशोक समेळ (Actor Ashok Samel) यांच्या वक्तव्यानं सध्या मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) खळबळ माजली आहे.
अभिनेते अशोक समेळ नेमकं काय म्हणाले? (Ashok Samel On Ani… Dr. Kashinath Ghanekar Movie)
अभिनेते अशोक समेळ म्हणाले की, “आणि काशिनाथ घाणेकर हा नुसता सिनेमा केला. बालगंधर्वाने काशीनाथचं काम करणं एवढंच मी म्हणेन. बालगंधर्व हे काशीनाथचं काम करु शकत नव्हते. कारण काशिनाथ रोबस्क होता, त्याचा अर्थ समजून घ्या. त्यामुळे त्या सिनेमाबाबत न बोललेलं बरं. आणि काशीनाथ घाणेकर हा खोटा सिनेमा होता असंच मी म्हणतो. ज्यांना कुणाला काही विचारायचं त्यांनी ते विचारायला माझ्या समोर यावं. फय्याज या अभिनेत्री आहेत. तिने आणि मी काशिनाथ बरोबर काम केलं आहे ती पण हेच सांगेल. आम्ही काशिनाथबरोबर काम केलं आहे. अर्धवट माहितीच्या आधारे कुणी काही करत असेल तर ती बदनामी आहे एका मोठ्या कलाकाराची असं मत अशोक समेळ यांनी व्यक्त केलं आहे…”
“जो माणूस कुठलाही नाटकाचा दौरा संपला की खिशातले पैसे बॅकस्टेजला वाटणार. प्रत्येकी 100 रुपये द्यायचे. असा माणूस कुठे बघायला मिळतो? नाटक आणि त्यासाठी झटणारी माणसं ही काशिनाथची फॅमिली होती. प्रेक्षकांमध्ये तो गुर्मीत वगैरे कधीही गेला नाही. तो स्वतःला अलिप्त ठेवायचा. ज्याच्याशी जमतं त्याच्याशी बोलायचा किंवा शांत राहायचा. तो कधीही अखडला वगैरे नाही. अश्रूची झाली फुले नाटकात मी आणि काशिनाथ होतो. सुरुवातीला मी धर्माप्पा केला होता, जो काशिनाथला पकडून आणतो ती भूमिका होती. मी प्रभाकर पणशीकरांकडे बसलो होतो गप्पा मारत तेवढ्यात फोन आला काशीनाथला. बिपीन नावाचा एक कलाकार होता त्याने सांगितलं मला मालवणच्या दौऱ्यावर जमणार नाही. तेव्हा मला ती धर्माप्पाची भूमिका मिळाली. व्यावसायिकला मी कसं करु? असं मी पंतांना विचारलं पण त्यांनी ऐकलं नाही. तू करतो आहेस, बास, अशी मला ती भूमिका मिळाली होती…”, असं अशोक समेळ म्हणाले.
पुढे बोलताना अभिनेते अशोक समेळ म्हणाले की, “मी दोघांबरोबर काम केलंय. दोघांमध्ये स्पर्धा अशी नव्हती… डॉ. लागू यांच्या अभिनयाची जात वेगळी होती. जितकं नैसर्गिक करता येईल तितकं ते करायचे. काशिनाथ त्याच्या उलट होता, तीन रांगांपर्यंत माझी बॉडी लँग्वेज आणि हावाभाव पोहचतात, पण वरच्या रांगांमध्ये माझा आवाज पोहचतो, तो मोठाच असला पाहिजे. कारण माझा प्रेक्षक तो आहे. माझा अभिनय लाऊड वाटला तरी हरकत नाही… माझा शब्द अन् शब्द प्रेक्षकांच्या कानावर गेला पाहिजे, यासाठी काशीनाथ आग्रही होता म्हणून तो मोठा होता, लागूंची पद्धत वेगळी होती…”
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष