Last Updated:
पुण्यातील कात्रज परिसरात पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. यात दोन तरुणांनी रस्त्यातच दुचाकीस्वाराला अडवलं
पुणे: तुम्हीही पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या अंधारात दुचाकीने प्रवास करत असाल, तर ही घटना नक्की वाचा आणि सावध राहा. पुण्यातील कात्रज परिसरात पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. यात दोन तरुणांनी रस्त्यातच दुचाकीस्वाराला अडवलं. यानंतर या दुचाकीस्वाराला वेढून, त्याच्या गळ्याशी धारदार लोखंडी हत्यार लावून धक्कादायक कांड केलं. या तरुणांनी व्यक्तीची लूटमार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतोषनगर भागातील डिलाइट बेकरीजवळ २३ जून २०२६ रोजी पहाटे हा थरारक प्रकार घडला. मात्र, या गुन्ह्यानंतर आंबेगाव पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून दोन्ही अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याप्रकरणी विकास रामचंद्र सकट (वय ४४, रा. मानाजीनगर, नऱ्हे, पुणे) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हे पहाटेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. ते संतोषनगर येथील डिलाइट बेकरीच्या जवळ आले असता, एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला.
काही समजण्याच्या आत, दुचाकीवरील एकाने विकास यांच्यावर थेट धारदार लोखंडी हत्यार उगारले आणि धमकी दिली. ते भीतीच्या छायेत असतानाच, दुसऱ्या नराधमाने त्यांच्या खिशात हात घालून ६ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली. विकास यांना धक्का देऊन दोघेही दुचाकीवरून सुसाट वेगाने पसार झाले.
भररस्त्यात झालेल्या या लुटीनंतर पीडित विकास सकट यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून आंबेगाव पोलिसांनी तातडीने तपास पथके रवाना केली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी मानव संदीप अडागळे (वय २३, रा. शनिनगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव खुर्द) आणि रेहान परवेज कुरेशी (वय १८, रा. इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, जांभुळवाडी रस्ता) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपींनी लूटमारीसाठी वापरलेली दुचाकी आणि धारदार हत्यार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), आर्म्स ॲक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटेच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Pune,Maharashtra
पहाटेची वेळ, निर्मनुष्य रस्ता अन् अचानक आडवी आली दुचाकी; धारदार हत्यार गळ्याला लावून.. पुण्यात धक्कादायक घटना
