RBI : यूपीआय स्कॅममध्ये किंवा ऑनलाईन फसवणूक झाल्यास खातेदाराला नुकसानभरपाई 25000 रुपये मिळणार, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय


नवी दिल्ली : भारतात डिजीटल पेमेंटसचा वापर वेगानं वाढत आहे. यूपीआय, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि कार्ड पेमेंटचं प्रमाण वाढलं आहे. याचा गैरफायदा घेत काही सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फ्रॉड करुन नागरिकांची फसवणूक केली जात आहे. हजारो लोक खोट्या लिंक्स, फेक कॉल आणि ओटीपी फ्रॉड आणि यूपीआय स्कॅमला बळी पडत आहेत. यामध्ये त्यांनी स्वत: कमावलेला पैसा गमवावा लागतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या फसवणुकींच्या प्रकरणांची दखल घेतली आहे. आरबीआयनं ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. 

Cyber Fraud : ऑनलाईन फसवणूक झाल्यास 25 हजार रुपये मिळणार

ऑनलाईन फ्रॉडमध्ये पैसे गमावणाऱ्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार पात्र ग्राहकांना सायबर फ्रॉडची नुकसानभरपाई म्हणून 25 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाऊ शकते. काही प्रकरणात ग्राहकांची छोटी टूक असली तरी नुकसानभरपाई दिली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी ग्राहकाला फसवणुकीनंतर तात्काळ तक्रार करावी लागेल. नुकसानभरपाई देण्याच्या निर्णयामुळं लोकांचा डिजीटल पेमेंटस सिस्टीमवरील विश्वास वाढेल आणि सायबर गुन्ह्यांमुळं फसवणूक झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळेल.

आरबीआयच्या नव्या नियमानुसार एखाद्या ग्राहकाची ऑनलाईन बँकिंग, यूपीआय, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यासंदर्भातील फसवणूक झाल्यास आणि त्याचं नुकसान 50000 रुपयांपर्यंत असेल तर त्याला कमाल 25000 रुपयांपर्यंत मदत दिली जाऊ शकते.  हा नियम छोट्या रकमेच्या सायबर फ्रॉडमध्ये पैसे गमावणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या नियमाला अंतिम रुप देण्यात आलं आहे. मात्र, याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2027 पासून करण्यात येणार आहे. पहिल्यांदा याची अंमलबजावणी 1 जुलै 2026 पासून करण्यात येणार होती. मात्र, काही कारणांमुळं त्याच्या अंमलबजावणीला सहा महिने लांबणीवर टाकण्यात आले. 

आरबीआयचा प्रस्ताव आणि अंतिम रचनेनुसार फसवणूक झालेल्या ग्राहकाला त्याच्या नुकसानाच्या 85 टक्के किंवा कमाल 25 हजार रुपये दिले जातील. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची 20 हजारांची फसवणूक झाल्यास त्याला तेवढीच रक्कम मिळेल मात्र, त्याचं 50 हजार रुपयांचं नुकसान झाल्यास  कमाल 25 हजार रुपये मिळतील.

आरबीआयच्या नव्या नियमानुसार सायबर फसवणूक झाल्यास पाच दिवसांच्या आत तक्रार करावी लागेल. जर, ग्राहकानं फसवणूक झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत बँक किंवा संबंधित संस्थेकडे तक्रार केल्यास त्याची नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता वाढेल. सायबर फ्रॉडची माहिती मिळताच लगेचच बँक हेल्पलाईन, सायबर हेल्पनाईन 1930 आणि राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार करावी.

दरम्यान, आरबीआयकडून सायबर फसवणुकीपासून दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार असली तरी ग्राहकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करु नका, ओटीपी कोणासोबतही शेअर करु नका. स्क्रीन शेअरिंग एप डाऊनलोड करुन नका. बँक प्रतिनिधी म्हणन एखाद्या व्यक्तीचा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *