Bollywood Actress Nafisa Ali Treking Amid Cancer: कॅन्सरच्या लास्ट स्टेजला हरवलं; लोकप्रिय अभिनेत्रीची 11 हजार फूट उंचीवर ट्रेकिंग; जिद्द पाहून सगळेच थक्क


Bollywood Actress Cancer: ‘लाईफ इन मेट्रो’, ‘गुजारीश’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री नफिसा अली (Nafisa Ali) कर्करोगाशी झुंज देत असतानाही आयुष्य नव्या उमेदीने जगताना दिसत आहेत. उपचार सुरू असतानाच त्यांनी कुटुंबासोबत तब्बल 11 हजार फूट उंचीवर ट्रेकिंग करत नव्या जीवनाचा आनंद लुटला. या खास प्रवासाचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नफिसा अली यांनी कर्करोगाशी लढा देताना आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. या गंभीर आजारावर मात केल्यानंतर स्वतःला नव्याने अनुभवत असल्याचे त्यांनी सांगितलं. कर्करोगाचे नाव ऐकताच अनेकजण खचून जातात. मात्र नफिसा  या आजाराला आयुष्यातील सर्वात मोठं आव्हान मानून त्याच्याशी खंबीरपणे सामना करत आहेत . वयाच्या 69व्या वर्षी त्या असे काहीतरी करत आहेत. जगण्याची नवी उमेद देणारी त्यांची जिद्द पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान

2018 मध्ये नफिसा अली यांना पोटाच्या आतील आवरणाचा आणि अंडाशयाचा चौथ्या स्टेजवरील कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. मात्र काही काळानंतर या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं. सध्या त्या आपली लेक अन्  जावयासोबत डोंगरातील सुंदर सहलीचा आनंद घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मनालीजवळील शेनाग खोऱ्यातील मुक्कामाचे फोटोही शेअर केले होते.

रोहतांगजवळ 11 हजार फूट उंचीवर ट्रेकिंग

अलीकडेच नफिसा यांनी रोहतांग खोऱ्याजवळ 11 हजार फूट उंचीवर ट्रेकिंग केले. त्यांनी या ट्रेकिंगचे व्हिडीओही शेअर केले असून त्यात त्या हिरव्यागार दऱ्यांमध्ये चालताना आणि विश्रांती घेताना दिसत आहेत. या व्हिडीओंसोबत त्यांनी लिहिलं की, “मित्र आणि कुटुंबासोबत 11 हजार फूट उंचीवर सुंदर सहलीचा आनंद घेतला. माझे जावई आणि नातू मला उतरताना मदत करत होते. शस्त्रक्रिया आणि अनेक रसायनोपचारांनंतर आता मला अगदी नव्यासारखं वाटत आहे.”

निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद

या व्हिडीओंमध्ये त्यांचे कुटुंबीय ट्रेकदरम्यान त्यांना आधार देताना दिसतात. तसेच नफिसा अली डोंगररांगांतील निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद घेतानाही पाहायला मिळतात. त्यांनी आणखी एका पोस्टमध्ये लिहिले की, “अटल बोगदा पार केल्यानंतर आम्ही सिसू येथे 11 हजार फूट उंचीवर सहलीचा आनंद घेतला. हा अनुभव अतिशय सुंदर होता. माझे जावई आदिल आणि नातू मला खडकाळ भागातून वर चढायला मदत करत होते. अखेर मी गाडीपर्यंत पोहोचले आणि हा प्रवास खूपच आनंददायी ठरला.”

आजाराचे संकेत आधीच समजलेले..

काही दिवसांपूर्वी नफिसा यांनी त्यांच्या आजाराविषयी बोलताना सांगितलेलं की, “माझ्या पोटातील वेदना कर्करोगामुळेच आहेत, हे मला आधीपासून जाणवत होते. मात्र डॉक्टरांना सुरुवातीला त्याचे योग्य निदान करता आले नाही. त्यामुळे हा आजार चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचला.”विशेष म्हणजे, नफिसा अली  यांनी 1976 मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *