Ambadas Danve: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जिल्हा बँक निवडणुकीत (District Bank Election) चक्क भाजप आणि महायुतीसोबत (Mahayuti) संधान बांधले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) असे दोन पॅनल झालेले असतानाही दानवे यांनी मविआऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत आत्तापर्यंत 8 जण बिनविरोधसंचालक झाले असून, 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. बिनविरोधचा प्रयत्न फसल्यानंतर महायुती आणि मविआचे पॅनल बनले असून, त्यांच्यात थेट लढत होत आहे. विशेष म्हणजे मविआचे पॅनल बनले असतानाही ठाकरे गटाचे नेते आ. अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बँक निवडणुकीतील हा निर्णय स्थानिक पातळीवरील असला तरी, चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण बाबीवर “बँकेत पक्षीय राजकारण नसते” अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याकडून हे नव्या राजकारणाचे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank: या दिग्गजांनी घेतले अर्ज मागे
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत 12 संचालकपदासाठी 31 उमेदवारांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार आहे. नवनिर्वाचित आ. सुहास शिरसाट, किशोर शितोळे, राजू शिंदे, हर्षदा शिरसाट, निशांत पाटील, अर्जुन पाटील, एकनाथ जाधव, राजू भुमरे, रवींद्र संचेती, देवयानी डोणगावकर, श्रद्धा माने, प्रदीप शिंदे, गोकुळसिंग राजपूत, बाबुराव पवार, कविता घुगे यांच्यासह अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
बँकेच्या 21 संचालकपदांसाठी 120 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. त्यात 83 उमेदवारांनी माघार घेतली. तर वैयक्तिक मतदार संघातून दाखल एकच अर्ज छाननीतच अवैध ठरला. त्यामुळे आता हे पद रिकामेच राहणार आहे. एकूण 20 संचालकपदांसाठीच ही निवडणूक होत असून पैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 12 जागांसाठी मंत्री अतुल सावे, कल्याण काळे, अनुराधा चव्हाण , अंबादास दानवे यांच्यासह 31 उमेदवार रिंगणात आहेत. दानवे यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank: जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध आलेले 8 संचालक
1. संजय शिरसाट — शिवसेना – शिंदे गट
2. विलास भुमरे — शिवसेना – शिंदे गट
3. रमेश बोरणारे — शिवसेना – शिंदे गट
4. अब्दुल समीर सत्तार — शिवसेना – शिंदे गट
5. अर्जुन गाढे — शिवसेना – शिंदे गट
6. संदीप निकम — भारतीय जनता पार्टी
7. दिनेश परदेशी — भारतीय जनता पार्टी
8. अनिल बोरसे — भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!