प्रसिद्ध दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या शोक प्रस्तावाच्या वाचनावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वादात सापडले आहेत. मराठीमध्ये वाचताना त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या. त्यांच्या मराठी उच्चारणावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. राहुल नार्वेकर यांनीच दिवंगत गायिका आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव मांडला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. काल राहुल नार्वेकर यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिलं.सर्वांसारखा मलाही मराठीचा अभिमान आहे. वाचन करताना माझ्याकडून चूक घडली, त्या बद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होता असं ते म्हणाले.
त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या पद्धतीचं वाचन त्यांनी केलं, जर फॉन्ट छोटा होता तर थांबायला हवं होतं त्यांनी. फॉन्ट बदलून घेता आला असता. मला तो फॉन्टचा प्रॉब्लेम वाटत नाही. तो वाचायचाच प्रॉब्लेम होता” असं संदीप देशपांडे म्हणाले. रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य केलं, तसं आमदार-खासदारांना पण मराठी अनिवार्य केलं पाहिजे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर संदीप देशपांडे म्हणाले की, “एका माणसाने असं केलं म्हणून सर्वांना दोषी धरता येणार नाही. बऱ्याच लोकांचं मराठी चांगलं आहे. ते चांगलं असलं पाहिजे. राहुल नार्वेकराचं मराठी चांगलं नसेल तर त्यांनी ट्यूशन लावावी. खर्च आम्ही करु”
नालेसफाईवरुन प्रशासनाला धारेवर धरलं
मुंबईत काल पहिल्याच पावसात प्रशासनाचे दावे किती फोल आहेत ते दिसून आलं. आज संदीप देशपांडे यांनी नालेसफाईवरुन प्रशासनाला धारेवर धरलं. “मूळात मला असं वाटतं की, एप्रिल-मे महिना तुम्ही नालेसफाईच्या बातम्या करत होता. रोज कोण ना कोण नालेसफाई पहायला जायचं. त्यांनी काय नालेसफाई पाहिली, हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो” असं संदीप देशपांडे म्हणाले.
सीसीटीव्ही लावा घरात बसून बघा
“पाहणी करण्यावर एक साधा, सिंपल पर्याय आहे. जिथे नालेसफाई होते, तिथे सीसीटीव्ही लावा घरात बसून बघा. मग नालेसफाईची ही नाटकं कशाला पाहणीची. तुम्ही पाहूनही नाले तुंबणार असतील तर कशाला पैसा वाया घालवायचे. काल महापौरांसमोर एक अधिकारी नाल्यात पडला. तिथे मॅनहोल उघडं होतं. जो पर्यंत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होत नाही, तो पर्यंत हे असचं सुरु राहणार. सत्ताधारी पक्ष अधिकाऱ्यांना का पाठीशी घालतो ते समजत नाही” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.