operation Tiger Devendra Fadnavis: एकवेळा नव्हे तर दोनवेळा ठाकरेंची शिवसेना फोडण्याची कामगिरी करुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या एकनाथ शिंदे यांना ‘ऑपरेशन टायगर’मध्ये (Operation Tiger) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची मदत मिळाल्याची माहिती आता समोर आली आहे. किंबहुना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच ‘ऑपरेशन टायगर’ खऱ्या अर्थाने मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेतील खासदार फोडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, ही चर्चा काही प्रत्यक्षात येत नव्हती. एकतर एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ला भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्त्वाकडून ग्रीन सिग्नल मिळत नव्हता. तर दुसरीकडे ठाकरे गटातील खासदारही शिंदे गटात गेल्यास पुन्हा निवडून येऊ का, याबाबत साशंक होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सहा खासदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या राजकीय भवितव्याची हमी घेतल्यानंतर हे खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics News)
‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई अत्यंत महत्त्वाची ठरली. मोहिमेसाठी आवश्यक खासदारांचे संख्याबळ पूर्ण करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच ठाकरे गटातील खासदारांच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरु झाली होती. खासदारांना भाजपमध्ये घ्यायचे की शिवसेनेत, याबाबत काही काळ संभ्रम होता, असे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘ऑपरेशन टायगर’मधील त्यांच्या सहभागाबाबत सूचक वक्तव्य केले होते. ऑपरेशन यशस्वी झाले आणि रुग्ण सुखरुप आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तेव्हाच ‘ऑपरेशन टायगर’मध्ये फडणवीस यांचा महत्त्वाचा रोल असल्याचे स्पष्ट झाले होते. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी अनेकदा ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, या मोहिमेला भाजप नेतृत्त्वाचा आशीर्वाद मिळत नव्हता. जानेवारी 2026 नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने ‘ऑपरेशन टायगर’चा गांभीर्याने विचार सुरु केला. मुख्यमंत्र्यांनी संबंधित खासदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आश्वासन दिल्यानंतर चर्चेला वेग आला. त्यानंतर या खासदारांनी ठाकरे गटातून बाहेर पडत लोकसभा अध्यक्षांना आपण स्वतंत्र गट स्थापन करुन शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले.
आणखी वाचा
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!