मुंबई : राज्यात गाजलेल्या पालघर साधू हत्याकांडांमुळे तत्कालीन सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. आता, मुंबईतील जोगेश्वरी परिसरात आज तथाकथि सांधूंना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. येथील परिसरातील काही तरुणांनी या तथाकथित साधूंना मारहाण करत, पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तत्पूर्वी हे साधू गेल्या 4 दिवसांपासून परिसरात संशयास्पद फिरत असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात 16 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू (महंत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशांतगिरी महाराज) व त्यांचा वाहनचालक निलेश तेलगडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान ‘मुले पळवणारी टोळी’ आल्याच्या अफवांमुळे संतप्त झालेल्या जमावाने ही मॉब लिंचिंग (जमावाने केलेली हत्या) केली होती. आता, मुंबईतील जोगेश्वरी परिसरातही तथाकथित साधूंना मारहाण करण्यात आली.
पालघरनंतर मुंबईच्या जोगेश्वरीत कथित भोंदू साधूंना नागरिकांनी चोप दिला. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरात ही घटना घडली असून दुर्गा नगर परिसरात नागरिकांनी चार जणांना पकडून धुलाई केल्याचा प्रकार उघडकीस आला. मागील चार दिवसांपासून अंधेरी-जोगेश्वरी परिसरात या साधूंच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याचा आरोप होत आहे. मुलांचे अपहरण करण्यासाठी साधू फिरत असल्याची स्थानिकांची शंका होती, त्यामुळे परिसरात लहान मुले आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी कथित साधूंना घेराव घालून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून चौघांनाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. साधूंची ओळख आणि परिसरातील हालचालींची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. तसेच, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
हेही वाचा
बीडमधील हत्येचा मुद्दा विधानसभेत; मुंडे-बंधु भगिनींकडून सखोल तपासाची मागणी, पूर्वनियोजित कटाचा आरोप
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या