Last Updated:
क्रिकेट खेळता खेळता प्रेमात पडल्या आणि मग दोघींनी एकमेकांसोबत लग्न केलं. भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेटपटूंची ही अनोखी लव्हस्टोरी आहे.
मुंबई : महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा धक्का बसला आहे. भारताने दिलेलं 159 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. मेरिझेन काप दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची शिल्पकार ठरली. मेरिझेनने 45 बॉलमध्ये 180 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 81 रन केले, ज्यात 7 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. याशिवाय तिने बॉलिंगमध्येही भारताच्या 2 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे तिला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मेरिझेन कॅपची लव्ह स्टोरी
मेरिझेन कॅप हिची लव्ह स्टोरी फारच रंजक आहे. मेरिझेनने तिच्याच दक्षिण आफ्रिकेच्या टीममधील सहकारी डॅन व्हेन निकर्कसोबत लग्न केलं. मुख्य म्हणजे भारताविरुद्धच्या सामन्यात मेरिझेन काप आणि डॅन व्हेन निकर्क या दोघीही मैदानात उतरल्या होत्या. डॅन व्हेन निकर्क हिला मात्र या सामन्यात बॅटिंगची संधी मिळाली नाही, तसंच तिने बॉलिंगही केली नाही.
जुलै 2018 साली मेरिझेन काप आणि डॅन व्हेन निकर्क यांनी लग्न केलं. यानंतर 2018 च्या वर्ल्ड कपमध्ये मेरिझेन आणि निकर्क या दोघी आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात एकत्र बॅटिंग करणाऱ्या पहिल्या बॅटर ठरल्या.
जुलै 2018 मध्ये लग्न
मेरिझेन काप आणि डॅन व्हेन निकर्क या लग्न करणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या. याधी न्यूझीलंडची ऍमी सॅटरर्थवेट आणि ली ताहूहू या दोन महिला क्रिकेटपटूंनीही लग्न केलं होतं. मेरिझेन केप हिने जुलै 2018 साली इन्स्टाग्रामवर पोस्ट करून डॅन व्हेन निकर्कसोबत लग्न केल्याची घोषणा केली. या दोघींनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले.
मेरिझेन काप हिचा जन्म 4 जानेवारी 1990 साली पोर्ट एलिझाबेथ येथे झाला, तर डॅन व्हेन निकर्क 14 मे 1993 साली दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियामध्ये जन्मली. डॅन व्हेन निकर्कने 110 वनडेमध्ये 36.7 च्या सरासरीने 2273 रन केले, ज्यात एक शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय तिने 91 टी-20 सामन्यांमध्ये 27.6 च्या सरासरीने 10 अर्धशतकांसह 1958 रन केले आहेत.
मेरिझेन कापने 162 वनडे सामन्यांमध्ये 35.1 च्या सरासरीने 3511 रन आणि 122 टी-20 सामन्यांमध्ये 20.1 च्या सरासरीने 1672 रन केल्या आहेत. मेरिझेनच्या नावावर वनडेमध्ये 4 शतकं आणि 17 अर्धशतकं तर टी-20 मध्ये 5 अर्धशतकं आहेत. याशिवाय तिने वनडेमध्ये 181 विकेट आणि टी-20 मध्ये 97 विकेट घेतल्या आहेत.
Mumbai,Maharashtra
Jun 21, 2026 11:58 PM IST
