हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला) रामराम ठोकत वेगळा गट स्थापन केल्यानंतर प्रथमच आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत त्यांनी हा निर्णय केवळ मतदारसंघातील विकासकामांसाठी घेतल्याचा दावा केलाय. तसेच १८ तारखेपर्यंत आम्ही कोणीच कुठे गेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचे गैर विश्वास किंवा बोलण्याचा अतिरेक झाला त्यानंतर बऱ्याच मंडळींनी विचार केला की तिथे थांबून काही उपयोग नाही, असे आष्टीकर म्हणाले.
नागेश पाटील आष्टीकर नेमके काय म्हणाले?
सत्तेशिवाय कार्यकर्त्यांची कुठलीही कामे होत नाहीत. त्यामुळे मी जे काही पाऊल उचललं त्यामागचे हे कारण असू शकेल. माझ्या मतदारसंघात विकास कामे करावी लागतील. मोठ्या आशेने लोकांनी मला निवडून दिलेले आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नव्हता. लोकांची अपेक्षा खूप आहे, मग यांची कामे कशी करायची, निधी कुठून मिळवायचा. सत्तेशिवाय काम होत नव्हती, त्यामुळे आम्ही बंड करण्याचे पाऊल उचलले, असे आष्टीकर म्हणाले.
संजय राऊत माझ्या वडिलांसारखे
कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती आणि अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत होते, त्यामुळे सत्तेत जाऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे आष्टीकर म्हणाले. खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलताना त्यांनी राऊत हे वडिलांसारखे असल्याचे सांगितले. त्यांनी काही बोलले तरी त्याचा राग नसल्याचे स्पष्ट करत, माझ्याबाबत असंवैधानिक भाषा वापरू नये, अशी विनंतीही नागरिकांना केली.
राऊत साहेब म्हणाले झोडून काढू , ते मोठे आहेत, माझ्या वडिलांप्रमाणे आहेत, ते काही बोलले तरी चालते. पण झोडायला आणि तोडायला कोणीच कमी नसते. सगळ्या गोष्टींचा विचार करून माणूस सगळे करत असतो. कदाचित नकळत कोणी यांचे ऐकून काही करायचा प्रयत्न केला, एखाद्या वेळेस सावध नसताना एखादी गोष्ट होऊ शकते , पण त्याचे परिणाम तुम्हालाही माहित आहे काय होऊ शकतात, असे सूचकपणे आष्टीकर म्हणाले.
शिवसेनेतून शिवसेनेतच आलो, विचारधारा सोडली नाही
आपण कुठेही दुसरीकडे गेलेलो नसून शिवसेनेतून शिवसेनेतच आलो आहोत, विचारधारा सोडलेली नाही, असेही नागेश पाटील आष्टीकर यांनी स्पष्ट केले. ज्या नागरिकांनी अपेक्षेने मतदान केले, त्यांची कामे होत नसतील तर दुसरा कोणता निर्णय घ्यायचा, असा उलट सवालही त्यांनी विचारला.
कार्यकर्ते मला सोडून जात होते
बऱ्याच जणांना मी घेतलेला निर्णय पटला नसेल. परंतु विकास आणि निधीसाठी सत्तेत जाणे क्रमप्राप्त आहे. काम होत नसल्याने कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. आणि मलाही पर्याय राहिला नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला, त्यामुळे काहीजण नाराज असतील, त्यांची नाराजी दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तरी कोणी नाराज होत असतील तर मला पर्याय नाही . पण विनंती करेल माझ्यासोबत राहा, असे आष्टीकर म्हणाले.