मुंबई : उन्हाळा संपला, सुट्ट्या संपून शाळाही सुरू झाल्या आहेत, जून महिना अखेरच्या आठवड्याकडे जातोय, पण अद्यापही पावसाने (Rain) रिपरिप केली नसल्याचं सर्वजण चिंतेत आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसह पशू-पक्षीही पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. हवामान वेधशाळेचे अंदाज पुढे पुढे जात आहे. आता, 25 जूननंतर राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन होईल, असा अंदाज आहे. पुणे (Pune), मुंबईतील काही भागात, भिवंडी, सातारा आणि कोकणातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, नागरिकांमध्ये काहीसे समाधान पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण होतं, आता मागील वीस मिनिटांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे शहरातील हडपसर, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा, कोथरूड या सर्वच भागांमध्ये आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. गेले काही दिवस पुण्यामध्ये चांगलाच उखाडा जाणवत होता, आता जोरदार पाऊस सुरू असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच एका पावसात स्वारगेट येथील मित्र मंडळ चौकाला तलावाचे स्वरूप आल्याने पादचारी मार्ग पाण्याखाली गेल्याचं दिसून आलं. तर, पिंपरी चिंचवडच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. मात्र, अद्यापही हलक्या सरी कोसळत आहेत, अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. मोसमी पावसाची शहरवासीयांना प्रतिक्षा आहे.
पुण्यासह सातारा, मुंबई आणि कोकणातही पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. साताऱ्यातील परळी खोऱ्यामध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाअभावी रखडलेल्या शेतीच्या मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे. पेरणीपूर्व तयारीसाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा आधार मिळाला आहे. मुसळधार पडलेल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत.
भिवंडीतही पावसाच्या सरी कोसळल्या
गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाडा आणि वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या भिवंडीकरांना अखेर पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला. शहरात रविवारी अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला, आणि नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, पावसाचे आगमन अचानक झाल्याने बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये नागरिकांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाऊस सुरू होताच अनेकांनी दुकाने, शेड आणि इमारतींचा आसरा घेतला, तर काही नागरिकांनी छत्र्यांचा आधार घेत आपापल्या कामासाठी मार्गक्रमण केले. दरम्यान, अनेक तरुण आणि लहान मुलांनी पहिल्या पावसाचा मनमुराद आनंद घेत पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
रत्नागिरीतही पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्येही पावसाची रिपरिप पाहायला मिळाली, तब्बल दहा ते पंधरा दिवसाच्या प्रतिक्षेनंतर चिपळूणमध्ये पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह चिपळूण मध्ये पावसाचे आगमन झाले असून पावसाअभावी धोक्यात आलेल्या भात पिकांना संजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा म्हणता येईल. तर, कडाक्याच्या उन्हामुळे प्रचंड त्रस्त झालेले नागरिक पावसाच्या आगमनामुळे सुखावले आहेत.
महाडमध्ये पावसाची जोरधार
मध्य रायगडनंतर आता दक्षिण रायगडमध्ये देखील जोरदार पाऊस पडला आहे. महाडमध्ये जोरदार पाऊस पडला असून सकाळपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर महाडमध्ये अखेर पावसाने हजेरी लावली. उकाडा आणि कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
पावसासाठी शिवभक्तांचा जांभळेश्वराला जलाभिषेक
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनने दडी मारल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना खेड येथे सकल हिंदू समाज आणि शिवभक्त समितीच्या वतीने पर्जन्यवृष्टीसाठी विशेष धार्मिक विधी करण्यात आला. खेडजाई-रेडजाई मातेचे दर्शन घेऊन शिवभक्तांनी जांभळेश्वर महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला आणि लवकरात लवकर पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली. यावेळी जांभळेश्वराला प्रतीकात्मक स्वरूपात पाण्यात कोंडून पर्जन्यवृष्टीचे साकडे घालण्यात आले. पुजारी दिलीप मोकाशी यांनी महादेव भक्तांच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद देतात, असा विश्वास व्यक्त केला. विविध देवतांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही वाचा
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?