Last Updated:
रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने थेट रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला.
पुणे : पुणे शहरात क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यांमध्ये होत असल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हडपसर परिसरातील गाडीतळ भागातून पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. यात रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाने थेट रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला. यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर बरोडा पवार (वय ३९, रा. वैदूवाडी, हडपसर) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात घडली. रिक्षाचालक पवार हे आपल्या रिक्षासह प्रवाशांच्या प्रतीक्षेत थांबले होते. त्याचवेळी आरोपी प्रवासी भागवत गुडाप्पा वाले (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) हा तिथे आला. त्याने पवार यांना वैदूवाडीला जाण्यासाठी किती भाडे घेणार, अशी विचारणा केली. मात्र, पवार यांनी सांगितलेले भाडे जास्त वाटल्याने भागवत याने तिथेच वाद घालण्यास सुरुवात केली.
रिक्षाचालक आणि प्रवाशांमधील हा वाद पाहता पाहता प्रचंड विकोपाला गेला. आरोपी भागवत गुडाप्पा वाले हा एका ठिकाणी रखवालदार (वॉचमन) म्हणून काम करतो. वाद सुरू असतानाच संतापाच्या भरात त्याने बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलला आणि काही समजण्याच्या आत रिक्षाचालक ईश्वर पवार यांच्या डोक्यात थेट प्रहार केला. या अनपेक्षित आणि भीषण हल्ल्यामुळे रिक्षाचालक पुरता घाबरला.
भरचौकात घडलेल्या या प्रकारामुळे हडपसर गाडीतळ परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी रिक्षाचालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी आरोपी भागवत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र, किरकोळ कारणांवरून भररस्त्यात घडणाऱ्या या धक्कादायक घटनांमुळे पुणेकर पुरते हादरले आहेत.
Pune,Maharashtra
भाडं किती घेणार? रिक्षाचालकाने रक्कम सांगताच प्रवासी संतापला; रस्त्यातच थेट डोक्यात घातला दगड, हडपसरमधील थरार
