Last Updated:
Sangli News: गेल्या अनेक दिवसांपासून सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक महिलेच्या शोधात होते. बस स्टँड परिसरामध्ये पोलिसांना गुप्तहेरकडून संशयित महिला असलेले ठिकाण समजले.
सांगली: गेल्या काही काळात सांगली बस स्टँड परिसरात सुरू असणाऱ्या भयंकर रॅकेटमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. गर्दीचा गैरफायदा घेत काही महिलांनीच एसटी प्रवाशांमध्ये दहशत निर्माण केली होती. नुकतेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी मोठी कारवाई केली. यात तामिळनाडूच्या एका महिलेला अटक केले असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या गुन्हेगार महिला आरोपीकडून तब्बल 10 लाख 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोनिशा मनी गंडन (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तामिळनाडू राज्यातील तालुका जिल्हा वेल्लूर येथील रहिवासी आहे.
संबंधित आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तिच्यावर कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समजते आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मालमत्ते विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश एलसीबीच्या पथकाला दिले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक चोरट्या महिलेच्या शोधात होते. सांगली बस स्टँड परिसरामध्ये पथकातील पोलिसांना गुप्तहेरकडून संशयित महिला असलेले ठिकाण समजले. अतिशय चाणाक्षपणे पथकातील दोन महिला पोलिसांनी गुन्हेगार महिलेस ताब्यात घेतले.
गुन्हेगार महिलेला ताब्यात घेतल्यानंतर महिला पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीमध्ये गुन्हेगार महिलेच्या पर्समध्ये तब्बल 67 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हाती आले. संबंधित गुन्हेगार महिलेने ते दागिने मे महिन्यात मिरज बस स्टँड वरती एका महिलेच्या पर्समधून चोरल्याची कबुली दिली. यामध्ये मिनी गंठण, मोठे गंठण, सोन्याचे झुबे, अंगठ्या अशा दागिन्यांचा समावेश आहे. अशा चोरट्यांच्या सुळसुळाटाने बस स्टँड परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.
Sangli,Maharashtra
Jun 20, 2026 10:14 PM IST
