पवनराजे आणि पद्मसिंह पाटालांमध्ये वाद का सुरु झाला? रक्ताच्या नात्यात फूट का पडली? वाचा सविस्तर – Marathi News | Osmanabad Pawanraje Nimbalkar murder case in detail The Story Behind a Political Family Feud


महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत चर्चित आणि संवेदनशील हत्याकांडाचा निकाल आज समोर आला आहे. २००६ साली नवी मुंबईतील कळंबोली येथे झालेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात मुंबई न्यायालयाने शनिवारी सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. यामुळे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर संशयितांवरील २० वर्षे जुना कलंक दूर झाला आहे.

भावकीचा विश्वास आणि राजकीय वैमनस्य

पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे सख्खे चुलत भाऊ होते. एकेकाळी दोघांमध्ये प्रचंड विश्वास आणि जवळीक होती. पद्मसिंह पाटील राज्यस्तरावर मंत्री आणि नेते म्हणून व्यस्त असल्याने आपल्या मतदारसंघात लक्ष देणे कमी झाले. त्यावेळी पवनराजे निंबाळकर यांनी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत धाराशिव मतदारसंघात सक्रिय काम सुरू केले. जनतेत मिसळून, समस्या सोडवून त्यांनी लवकरच मोठी लोकप्रियता मिळवली. युवकांसह सर्वसामान्य मतदारांमध्ये त्यांची छाप पडली होती. हळूहळू पवनराजे यांच्यात राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या. आमदारकीच्या स्वप्नाने त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. यामुळे पद्मसिंह पाटील अस्वस्थ झाले. प्रथम समजूत घालण्याचे प्रयत्न झाले, पण पवनराजे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. यातूनच दोघांमध्ये राजकीय वैर निर्माण झाले.

२००४ ची थरारक लढत

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत चुलत भावांमध्ये थेट सामना झाला. पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर पवनराजे निंबाळकर यांना काँग्रेसचा पाठिंबा होता असे म्हटले जाते. संपूर्ण महाराष्ट्राने या लढाईकडे लक्ष लावले होते. अखेर पद्मसिंह पाटील थोड्या मतांनी विजयी झाले, मात्र त्यांच्या मतांमध्ये मोठी घट झाल्याने चर्चेला उधाण आले. या निवडणुकीनंतर दोघांमधील दुरावा अधिक वाढला.

२००६ ची निर्घृण हत्या

३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची भर दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उस्मानाबादकडे जाणाऱ्या गाडीतून ते जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत गोळीबार केला. या हल्ल्यात पवनराजे आणि त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येसाठी परदेशी बनावटीची बंदूक वापरण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयने २००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आठ जणांवर कट रचण्याचा आरोप केला होता.

निकाल आणि राजकीय परिणाम

या हत्याकांडाने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. पवनराजे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर राजकारणात सक्रिय झाले आणि सध्या ते धाराशिवचे खासदार आहेत. दुसरीकडे, ‘पुढचे मुख्यमंत्री’ म्हणून चर्चेत असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय वाटचालीला मोठा धक्का बसला. त्यांना काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला.
कुटुंबातील नातेसंबंध इतके बिघडले की, दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमेकांकडे पाहणेही सोडले होते. आता २० वर्षांनंतर न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *