मोठी बातमी! NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर BEST प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय; संप कर्मचाऱ्यांना MESMA ची नोटीस


मुंबई : राजधानी मुंबईत बेस्ट (Best) कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत असून बाहेरुन आलेल्या पर्यटकांनाही या संपाचा फटका बसत आहे. याशिवाय, उद्या होणाऱ्या नीट (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनाही मुंबईतील बेस्ट बसच्या संपाची मोठी अडचण ठरू शकते, त्याच पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाकडून प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (MESMA) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असून वेट लीज कंत्राटदारांनाही MESMA अंतर्गत नोटीस देण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) 100 बसेस उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, मुंबईतील 63 NEET परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी अतिरिक्त 60 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस सकाळी 9 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत चालवण्याचे आदेश डेपो व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, बेस्टच्या वीज विभागावर या संपाचा कोणताही परिणाम झालेला नसून अत्यावश्यक वीज सेवा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांना सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह सेवा देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून संपाचा परिणाम कमी करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबवल्या जात असल्याचे बेस्ट प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.

MESMA कायदा म्हणजे काय? 

MESMA म्हणजेच,  (Maharashtra Essential Services Maintenance Act) या कायद्याअंतर्गत अत्यावश्यक सेवा (जसे की वाहतूक, वीज, पाणी इ.) सुरळीत ठेवण्यासाठी सरकारला संप किंवा काम बंद आंदोलनावर काही निर्बंध घालण्याचे अधिकार मिळतात. या कायद्यानुसार संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस, कारवाई किंवा कायदेशीर दंडाची प्रक्रिया होऊ शकते. दरम्यान, आता बेस्टच्या प्रकरणात प्रशासनाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना MESMA अंतर्गत नोटीस बजावल्याचे सांगितले आहे.

संपाला उदंड प्रतिसाद

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीकडून संपाची (BEST employees strike) हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनीवर त्याचा परिणाम होणार असून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. तर 2766 पैकी केवळ 32 बस रस्त्यावर धावताना दिसत आहे.

हेही वाचा

दाढीचे कुरळे केस म्हणताच जैन मुनी निलेशचंद्र संतापले; राज ठाकरेंच्या टीकेला आक्रमक उत्तर, म्हणाले…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *