‘…नाहीतर आयुष्यभर रडावं लागेल’, ‘रामायण’च्या ‘लक्ष्मण’ने शेअर केला जळजळीत VIDEO, नव्या पालकांचे टोचले कान | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

रामानंद सागर यांच्या ऐतिहासिक ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मण ही अजरामर भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सुनील लहरी सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आले आहेत.

News18
News18

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या की बच्चेकंपनीची शाळा सुरू होते. मग त्यांच्यासाठी नवी दप्तरे, वह्या-पुस्तके, गणवेश यांची खरेदी सुरू होते. अशातच रामानंद सागर यांच्या ऐतिहासिक ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मण ही अजरामर भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सुनील लहरी सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आले आहेत. सध्याच्या घडीला ते ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर असले, तरी सोशल मीडियावर ते नेहमीच चालू घडामोडींवर सडेतोड भाष्य करत असतात.

नुकताच त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये दिसणारा निरुत्साह आणि पालकांच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवले आहे. मुलांच्या मनातील शिक्षणाची भीती कशी घालवावी, याचं एक भन्नाट गणित त्यांनी मांडलं आहे.

सुनील लहरी यांनी व्यक्त केली भीती

सुनील लहरी व्हिडिओमध्ये म्हणतात, “देशात अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होऊन ८-१० दिवस झाले आहेत, तर काही ठिकाणी शाळा आता उघडणार आहेत. पण मी एक गोष्ट नोटीस केली आहे की, शाळेत जाणाऱ्या बहुतांश मुलांच्या चेहऱ्यावर कोणताही आनंद किंवा उत्साह दिसत नाहीये. मुलं अजूनही सुट्टीच्या सुस्तावलेल्या मूडमध्ये आहेत आणि पालकही अगदी नाईलाजाने मुलांना शाळेत सोडायला जात आहेत. असं का होतं? कारण आपण लहानपणापासूनच मुलांसमोर अभ्यासाचा एक बागुलबुवा उभा केला आहे. आपण खेळण्याला जेवढं मनोरंजक बनवतो, तितकं अभ्यासाला रंजक बनवण्यात आपण अपयशी ठरलो आहोत.”

पालक आणि मुलांना थेट इशारा देताना सुनील पुढे म्हणाले, “अभ्यासाकडे ओझं म्हणून पाहणं बंद करा. जर मुलांनी आपल्या आयुष्यातील सुरुवातीची १५ ते १८ वर्षे मनापासून अभ्यास केला आणि कठोर परिश्रम घेतले, तर ते पुढचं संपूर्ण आयुष्य राजासारखं सुखात घालवू शकतात. पण, जर आता अभ्यासाच्या वयात फक्त मौजमजा केली, तर मात्र पुढचं अख्खं आयुष्य रडण्यात घालवावं लागेल, हे नक्की!” इतकंच नाही, तर यावेळी त्यांनी पालकांना कानमंत्र दिला की, मुलांना मारून-झोडपून किंवा दडपण आणून शिकवण्यापेक्षा खेळता खेळता कसं शिकवता येईल, याकडे लक्ष द्या.

सुट्ट्यांमध्ये परदेशी ट्रिप्सपेक्षा गावातील मातीला द्या प्राधान्य

काही आठवड्यांपूर्वी शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओमध्ये सुनील लहरींनी पालकांना एक घरचा आहेर दिला होता. ते म्हणाले होते की, “आजकाल उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की पालक मुलांना घेऊन थेट परदेशात किंवा मोठ्या मॉलमध्ये फिरायला जातात. यामुळे मुलं आपल्या संस्कृतीपासून आणि मातीपासून दूर जात आहेत. पालकांनी मुलांना गावाकडे नेलं पाहिजे; आपण जे अन्न रोज ताटात खातो, ते शेतात कसं पिकतं, हे त्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे.”

मराठी बातम्या/मनोरंजन/

‘…नाहीतर आयुष्यभर रडावं लागेल’, ‘रामायण’च्या ‘लक्ष्मण’ने शेअर केला जळजळीत VIDEO, नव्या पालकांचे टोचले कान



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *