Sanjay Manjrekar on Vaibhav Sooryavanshi Controversy : युवा भारतीय क्रिकेट सुपरस्टार वैभव सूर्यवंशी सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. सोमवारी श्रीलंका अ संघाकडून सुपर ओव्हरमध्ये भारत अ संघाचा पराभव झाल्यानंतर, मैदानावरच त्याचा एका श्रीलंकन क्रिकेटपटूसोबत वाद आणि झटापट झाली. दंबुला येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्याच्या शेवटी, वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेचा विशेन हलाम्बागे यांच्यात मैदानावरच बाचाबाची झाली. वातावरण खूपच तणावपूर्ण झाले होते. श्रीलंका अ संघाचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने हस्तक्षेप करून त्या दोन खेळाडूंना वेगळे केले. दरम्यान, मैदानावर झालेल्या वादावर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “मैदानावर कोणत्याही प्रकारचा शारीरिक संघर्ष किंवा धक्काबुक्की अजिबात सहन केली जाऊ शकत नाही आणि अशा वर्तनावर कडक कारवाई झालीच पाहिजे,” असे स्पष्ट मत मांजरेकर यांनी मांडले आहे.
नेमकी काय घडली घटना?
हा वाद तिंरगा मालिकेच्या चौथ्या सामन्यादरम्यान झाला. या अटीतटीच्या सामन्यात श्रीलंका अ संघाने सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव केला. सामना संपल्यानंतर टीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. भारताचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी श्रीलंकेच्या खेळाडूंच्या दिशेने गेला आणि त्याने श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलाम्बागे याला जोरात धक्का दिला.
वादामागचे कारण काय होते?
सामन्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, विशेन हलाम्बागे संपूर्ण मालिकेत वैभववर सतत Sledging करत होता. रिपोर्ट्सनुसार, हलाम्बागेने वैभवला डिवचत म्हटले होते की, “घरी जा, हा आयपीएल सामना नाही.” या उकसावण्यामुळे वैभवचा संयम सुटला. सामना संपल्यावर हलाम्बागे जेव्हा वैभव आणि सूर्यांश शेडगे यांच्याजवळ आला, तेव्हा वाद आणखी वाढला. अखेर श्रीलंकेचा यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याला मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला.
संजय मांजरेकर यांचे मोठे वक्तव्य
संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देताना लिहिले की, “जर मी भारत अ संघाचा प्रशिक्षक (Coach) किंवा व्यवस्थापक (Manager) असतो, तर अफगाणिस्तान अ विरुद्धच्या पुढच्या सामन्यात वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नसते. मैदानावर शारीरिक ताकद दाखवणे किंवा कोणाला धक्का देणे पूर्णपणे चुकीचे आहे, मग समोरच्याने कितीही उचकवले तरी चालणार नाही. त्याला हा धडा मिळणे गरजेचे होते.”
मालिकेत वैभवची सुमार कामगिरी
एकीकडे हा वाद सुरू असताना, दुसरीकडे या स्पर्धेत वैभवला आपल्या बॅटने विशेष कमाल दाखवता आलेली नाही. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरत आहे. अफगाणिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात त्याने 28 चेंडूत 38 धावा केल्या. या स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये त्याने 14, 44, 21 आणि 38 अशा धावा केल्या आहेत. वैभव सध्या फॉर्मात नसला तरी नुकतीच त्याची आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय वरिष्ठ संघात निवड झाली आहे. या निवडीसह तो भारतासाठी निवडला गेलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा ऐतिहासिक विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला