Taare Zameen Par: 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ (Tare Zameen Par) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आमिर खान दिग्दर्शित या सिनेमातील ईशान अवस्थी आणि त्याच्या कुटुंबाची कथा आजही अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात ईशानचा हुशार मोठा भाऊ ‘योहान अवस्थी’ साकारणारा बालकलाकार आठवतोय? या भूमिकेत अभिनेता सचेत इंजिनिअर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मात्र चित्रपटानंतर सचेत अचानक मनोरंजनविश्वातून गायब झाला. मात्र जवळपास दोन दशकांनंतरही प्रेक्षक त्याला ईशान अवस्थीच्या मोठ्या भावाच्या भूमिकेसाठी ओळखतात.
चित्रपटातील योहानप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही हुशार
‘तारे जमीन पर’मध्ये सचेतने योहान नंदकिशोर अवस्थी ही भूमिका साकारली होती. अभ्यासात अव्वल, टेबल टेनिसमध्ये पारंगत आणि आपल्या लहान भावाची काळजी घेणारा योहान हा ईशानच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा दाखवण्यात आला होता. ईशानला अक्षरे आणि अंक समजण्यात अडचणी येत असताना योहान शाळेत उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतो. पण तुम्हाला माहिती का, खऱ्या आयुष्यातही ईशानचा ऑन स्क्रीन भाऊ अभिनेता सचेत त्याच्या या भूमिकेशी बऱ्याच अंशी सारखा आहे.

यूकेमध्ये मिळवली मोठी ओळख
अनेक बालकलाकारांप्रमाणे प्रसिद्धीच्या मागे न लागता सचेतने शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने लंडनमधील UCL Eastman Dental Institute मधून Periodontology मध्ये M.Clin.Dent पदवी मिळवली आहे. तसेच तो युरोपियन फेडरेशन ऑफ पीरियडोंटोलोजी (EFP) चा नोंदणीकृत सदस्य आहे. याशिवाय त्याने ओव्हरसीज रजिस्ट्रेशन एक्झामिनेशन (ORE) चे दोन्ही टप्पे उत्तीर्ण केले असून त्यामुळे तो यूकेमध्ये डेंटिस्ट होण्यास पात्र ठरला आहे. परदेशात जाण्यापूर्वी त्याने डी. वाय. पाटील विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं. Periodontology मध्ये सुवर्णपदकही पटकावलं होतं. त्यामुळे त्याची शैक्षणिक गुणवत्ता केवळ पडद्यावरील भूमिकेपुरती मर्यादित नाही, तर खऱ्या आयुष्यातही तो तेवढाच हुशार आहे.

पायलट होण्यासाठीही घेतोय प्रशिक्षण
दंतवैद्यक क्षेत्राबरोबरच सचेतला विमान उड्डाणाचीही आवड आहे. 2024 मध्ये त्याने विमानाच्या कॉकपिटमधील एक फोटो शेअर करत आपल्या पहिल्या उड्डाणाचा अनुभव सांगितला होता.त्याने लिहिलं होतं, “आकाश नियंत्रणात असताना जमिनीवरील मोठमोठी आव्हानेही क्षुल्लक वाटतात. क्षितिज अमर्याद आहे आणि शक्यताही तितक्याच अमर्याद आहेत. माझे पहिले उड्डाण, पण निश्चितच शेवटचे नाही.”

बॉलिवूडमध्ये पुनरागमनाची इच्छा
अभिनय क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतरही सचेतने बॉलिवूडचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत. एका मुलाखतीत त्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र चार वर्षांनंतरही त्याच्या पुनरागमनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही ‘तारे जमीन पर’मधील ईशानच्या गुणी मोठ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या सचेत इंजिनिअरला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता कायम आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष