India vs Afghanistan 2nd ODI Playing-11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना 17 जून (बुधवार) रोजी लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया सध्या 1-0 ने पुढे आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा नजर मालिका जिंकण्यावर असेलच, पण सोबतच टीम मॅनेजमेंट पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचा विचार करून बेंचवर बसलेल्या खेळाडूंना आजमावून पाहू इच्छिते आहेत. धर्मशाळेत झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात फिरकीपटू हर्ष दुबे आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना पदार्पणाची संधी मिळाली होती आणि दोघांनीही आपल्या कामगिरीने प्रभावित केले. हर्ष आणि गुरनूर या दोघांनीही प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या होत्या.
रोहित शर्माच्या दुखापतीमुळे यशस्वी जैस्वालची एन्ट्री?
पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना माजी कर्णधार रोहित शर्माच्या मनगटाला चेंडू लागला होता. मैदानावर उपचार घेतल्यानंतर रोहितने फलंदाजी सुरू ठेवली, पण तो धावबाद झाला. धावा करताना रोहित काहीसा अडचणीत दिसत होता. 39 वर्षीय रोहितच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता, मॅनेजमेंट त्याला विश्रांती देण्याचा विचार करू शकते. रोहितला विश्रांती दिल्यास फॉर्मात असलेल्या तरुण यशस्वी जैस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. जैस्वालने यापूर्वी जेव्हा-जेव्हा दुखापतग्रस्त खेळाडूची जागा घेतली आहे, तेव्हा त्याने दमदार कामगिरी केली असून, गेल्या अशाच एका सामन्यात त्याने नाबाद शतकही ठोकले होते.
कुलदीप यादव की हर्ष दुबे?
पहिल्या वनडेत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला बाहेर ठेवून डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेला पदार्पणाची संधी देण्यात आली होती. हर्षने 5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आयपीएल 2026 मधील सुमार कामगिरी आणि मुल्लानपूर येथील कसोटीत लय सापडण्यात आलेले अपयश यामुळे कुलदीपच्या फॉर्मात घसरण झाली आहे. मात्र, वनडे फॉरमॅटमधील त्याचा अनुभव पाहता, मधल्या ओव्हर्समध्ये तो अजूनही भारताचा हुकमी एक्का ठरू शकतो.
प्रिंस यादव करणार पदार्पण?
पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने पदार्पण करत सपाट पट्टीवर 3 गडी बाद केले होते. आता भारतीय संघात प्रिंस यादव हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. आयपीएल 2026 मध्ये प्रिंसने लखनऊ सुपर जायंट्ससाठी जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्याला या मैदानाचा चांगला अनुभव आहे. जर प्रिंस यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचे असेल, तर पहिल्या सामन्यात एकही विकेट न मिळू शकलेल्या प्रसिद्ध कृष्णाला बाहेर बसावे लागू शकते.
दुसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य ‘प्लेइंग इलेव्हन’ (IND vs AFG 2nd ODI Probable XI) : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा / यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा / प्रिंस यादव.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला