Sri Lanka A beat India A in super over Tri Nation A Series : श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या तिंरगा मालिकेत भारताचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा आपल्या खेळापेक्षा मैदानातील एका वादामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. श्रीलंका अ संघाविरुद्धच्या सामन्यानंतर वैभवने केलेल्या एका कृत्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावरून कडाडून टीका होत आहे. दरम्यान, या वादात आता श्रीलंकेच्या एका माजी क्रिकेट व्यवस्थापकाने अत्यंत वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याने नवा वाद पेटला आहे.
काय आहे संपूर्ण वाद?
भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात झालेला हा सामना चुरशीचा ठरला आणि शेवटी तो सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विजयानंतर श्रीलंकन खेळाडू जल्लोष करत असतानाच दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक उडाली. हा वाद वाढला जेव्हा भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी एका श्रीलंकन खेळाडूजवळ गेला आणि त्याने त्याला धक्का मारला. प्रत्युत्तरात त्या खेळाडूनेही वैभवला धक्का दिला. मैदानावर उपस्थित इतर खेळाडूंनी आणि पंचांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवला. परंतु, या धक्काबुक्कीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर क्रीडा जगतातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Vaibhav got into a heated argument with Sri Lankan players after the super over pic.twitter.com/wnGyEF6Nvw
— Abhi (@AbhiMSD_07) June 15, 2026
ब्रायन थॉमस यांचे वादग्रस्त वक्तव्य
या प्रकरणावर श्रीलंकन संघाचे माजी व्यवस्थापक ब्रायन थॉमस यांनी सोशल मीडियावरून वैभव सूर्यवंशीवर निशाणा साधला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी वैभवच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. “भारताच्या एका खेडेगावातून येणाऱ्या मुलाकडून कदाचित अशाच प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा केली जाऊ शकते. तिथे खेळाडूंच्या शिक्षणाची कमतरता असते. जर वैभवला येथील परिस्थिती आवडत नसेल, तर तो आपल्या देशात परत जाऊ शकतो, कारण क्रिकेट हा जेंटलमन्स गेम मानला जातो.” असे ते म्हटले.
ब्रायन थॉमस एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पुढे म्हटले की, जर क्रिकेटमध्ये फुटबॉलप्रमाणे रेड किंवा पिवळे कार्ड असण्याची सोय असती, तर अशा वर्तनावर तात्काळ कारवाई झाली असती. मॅच रेफरीने वैभवला पुढील सामन्यासाठी निलंबित केले पाहिजे, जेणेकरून त्याला खेळाडूवृत्ती आणि शिस्तीचे महत्त्व समजेल.
कारवाईची शक्यता, नियम काय सांगतो?
क्रिकेटच्या नियमांनुसार, मैदानात विरोधी संघाच्या खेळाडूशी शारीरिक गैरवर्तन किंवा धक्काबुक्की करणे हा गंभीर शिस्तभंग मानला जातो. डाव्या हाताचा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या या कृत्यामुळे आता त्याच्यावर मॅच रेफरी आणि आयसीसीच्या नियमांनुसार कडक कारवाई किंवा निलंबनाची टांगती तलवार आहे. सध्या मॅच ऑफिशियल या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला