Bishkek International Film Festival: गेल्या अनेक वर्षांपासून किर्गिस्तानला (Kyrgyzstan) पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे. बर्फाच्छादित डोंगर रांगा आणि स्वच्छ शहरांसाठी पर्यटक किर्गिस्तानला येतात. मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी भारतातल्या विद्यार्थ्यांचा ओढा बिश्केक (Bishkek) अर्थात इथली राजधानीचं शहर आहे. पण आता किर्गिस्तानाची नवी ओळख तयार होतेय. बिश्केक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या (Bishkek International Film Festival) निमित्ताने. यंदा फेस्टिव्हलचं चौथं वर्ष होतं. पण आयोजन आणि नियोजनात बिश्केक फिल्म फेस्टिव्हलनं वरचा नंबर गाठलाय.
बिश्केक (Bishkek) शहर हे सर्वाधिक प्रसिध्द आहे ते मध्यवर्ती असलेल्या अल-आ-तूर स्क्वेअरसाठी. हा ऐतिहासिक चौक आहे. जिथं आजवरची मोठी आंदोलनं झाली. 1991 ला रशियापासून वेगळं झाल्यानंतर किर्गिझ रिपब्लिक अशी नवी ओळख तयार झाली. त्यानंतर या चौकात अनेक आंदोलनं झाली. या चौकातच बिश्केक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली. एमिली (2002) या फ्रेंच सिनेमातून जगभरात पोचलेली अॅन्ड्र्यू टाटू यंदाच्या फेस्टिवलची विशेष पाहुणी होती. तिला यंदा सिनेमा क्षेत्रातल्या योगदानासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला.
बिश्केकमध्ये 44 देशांचे जवळपास 100 हून अधिक सिनेमे दाखवण्यात आले. पण बिश्केकची खासियत वेगळी आहे. तिथं मध्य आशियातलं सिनेमाचं मार्केट विकसित करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. CAF Pitch आणि BARs In Progress माध्यमातून किर्गिझ आणि आशियातल्या सिनेमांना मार्केट मिळवून देण्याचं मोठं काम इथं केलं जातंय. सध्या त्याची व्याप्ती कमी असेल. पण भविष्यात बिश्केकमध्ये मध्य आशियातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं आशियाई फिल्म मार्केट तयार होण्याची ही मुहूर्तमेढ आहे.
बिश्केक फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वात आकर्षण ठरलं ते इथलं स्काय कार्पेट (SKY Carpet). खाली निळं कार्पेट आणि वर निळंशार आकाश अशी ही फेस्टिव्हलची नवी ओळख तयार होत आहे. यंदाचं चौथं वर्ष असतानाही जगभरातले फेस्टिव्हल प्रोग्रामर, क्युरेटर, वेगवेगळ्या देशांचे माध्यम प्रतिनिधी अशी भन्नाट मंडळी या स्काय कार्पेटवर चालली.
खास किर्गिझ अंदाजात ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी पार पडला. जग गाजवलेला इंडोनेशियाचा ऑन युअर लॅप (2025) हा रेझा रमादानचा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला. द डिवाईन आयडियल ऑफ किलींग (2026) या इराणच्या सिनेमाचा दिग्दर्शक आरियोबारझान सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरली.
आठवडा भर इथं स्क्रिप्ट वर्कशॉप, नव्या दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजम करण्यात आलं. भारतातर्फे एकमेव माया सत्य भ्रम (2026) हा सामाजिक रॉय चौधरीचा सिनेमा मुख्य स्पर्धेत होता. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
किर्गिस्तानमध्ये बॉलिवुडचे (Bollywood News) हिंदी सिनेमे (Hindi Movie) प्रसिद्ध आहेत. आधी राज कपूर, नंतर मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि आता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांची क्रेझ पाहायला मिळाली. सिनेमा पाहून पाहून हिंदी बोलणारे अनेक लोक इथं भेटले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Shape of Momo: शेप ऑफ मोमो’: सिक्किमच्या गर्द झाडीतलं ‘फेमिनिस्ट’ वादळ